नेपाळ पूर : बोगद्यांमध्ये अडकले 900 हून अधिक लोक, त्यांना वाचवण्यासाठी काय केलं जातंय?

चिलिमे जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ काम करताना बचाव पथकातील कर्मचारी

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, चिलिमे जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ काम करताना बचाव पथकातील कर्मचारी
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. या पुरात 900 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, जवळपास 4000 जण बेपत्ता आहेत.

मदतकार्यासोबतच नेपाळमध्ये बचावकार्यही जोरात सुरू आहे. नेपाळमधील विविध जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये हे बचावकार्य सुरू आहे.

नेपाळमधल्या वेगवेगळ्या जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये जवळपास 933 जण अडकले असल्याचा अंदाज आहे.

अप्पर त्रिशूली-1, त्रिशूली-3ए आणि त्रिशूली-3बी प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत.

हे प्रकल्प नेपाळमधील वीज निर्मितीचे महत्त्वाचे स्रोत आहेत. यापैकी काही प्रकल्पांचे बोगदे एकमेकांना जोडलेले आहेत.

त्रिशूली-3बी प्रकल्प, त्रिशूली-3ए प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याचा वापर करतो. अप्पर त्रिशूली-1 हा नदीवर उभारण्यात आलेला सर्वात उंच जलविद्युत प्रकल्प आहे. पूर आला, त्यावेळी या प्रकल्पाचं बांधकाम सुरू होते.

रविवारी (30 ऑगस्ट) बचाव पथकांनी त्रिशूली-3ए प्रकल्पाच्या बोगद्यात प्रवेश करण्यासाठी मोठे छिद्र पाडले होते.

बचाव पथकाने बोगद्याच्या आत अनेकदा आवाज दिला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी दिली.

कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत?

नेपाळमधल्या 13 जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये अनेक कर्मचारी अडकले असण्याची शक्यता आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी नेपाळचे अधिकारी आता डोंगरांमध्ये नियंत्रित स्फोट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सोमवारी (31 ऑगस्ट) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास रसुवा इथं त्रिशूली-3ए जलविद्युत प्रकल्पाचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रकल्पाच्या ठिकाणी नियंत्रित स्फोट करण्यात आला.

नेपाळच्या उत्तर भागात पुढील काही दिवसांत आणखी पावसाचा अंदाज आहे. मुसळधार पावसामुळे बचावकार्य अधिक कठीण होत आहे.

उत्तरेकडील भागात पुढील काही दिवसांत आणखी पावसाचा अंदाज आहे.

फोटो स्रोत, PMO

फोटो कॅप्शन, उत्तरेकडील भागात पुढील काही दिवसांत आणखी पावसाचा अंदाज आहे.

बीबीसी नेपाळीचे प्रतिनिधी संजय ढकाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जवान रसुवागढी जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात गेले होते. मात्र, त्यांना तिथे कोणीही आढळले नाही. बोगद्याच्या आत शोध घेण्यासाठी त्यांनी ड्रोनचाही वापर केला.

दरम्यान, भारत, चीन आणि दक्षिण कोरियातूनही अनेक बचाव पथकं बोगद्यातील बचावकार्यात मदत करण्यासाठी नेपाळमध्ये पोहोचली आहेत.

नेपाळ सरकारच्या म्हणण्यानुसार, बोगद्यातील बचावकार्य आणि मृतदेहांची डीएनएच्या माध्यमातून ओळख पटवण्यासारख्या तांत्रिक बाबींमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे.

ज्यांचे नातेवाईक बोगद्यात अडकले आहेत, ते लोक काय म्हणाले?

बीबीसीने प्रिया खरेल यांच्याशी संवाद साधला. आपल्या भावाबद्दल माहिती मिळवण्यासाठी त्या धडपडत आहेत. त्यांचा भाऊ एखाद्या बोगद्यात अडकला असण्याची शक्यता आहे.

त्यांचे भाऊ मिलन खरेल हे अपर त्रिशूली-1 जलविद्युत प्रकल्पात अभियंता आहेत.

प्रिया यांनी म्हटलं, "बाहेर आलेल्या लोकांनी बोगद्यात लोक असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे लष्कराने त्यांना लवकर शोधलं तर त्यांना वाचवता येईल, अशी आशा मला आशा."

मात्र, त्यांच्या भावाबद्दल नेमकी माहिती अजूनही त्यांना मिळालेली नाहीये.

"आम्ही वाचवण्यात आलेल्या, बेपत्ता आणि मृत व्यक्तींची यादी पाहण्याचा प्रयत्न केला. पण कुठेही त्यांचं नाव नव्हतं."

चिनी बचावपथकाचे कर्मचारी सोमवारी (31 ऑगस्ट) नेपाळमधील लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रात पोहोचले.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, चिनी बचावपथकाचे कर्मचारी सोमवारी (31 ऑगस्ट) नेपाळमधील लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रात पोहोचले.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्रिशूली-3ए प्रकल्पाच्या बोगद्यात आपले पती अडकले असावेत, अशी भीती एका महिलेला वाटत आहे. पण ते अजूनही जिवंत असतील, अशी आशाही त्यांना आहे.

सीता पांडे यांनी नेपाळच्या 'कांतिपुर' वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं,"ते अजूनही जिवंत असण्याची शक्यता 50 टक्के आहे. मला आशा आहे. कारण बोगद्याच्या आत ऑक्सिजनची व्यवस्था आहे."

"पण वेळ जसा जात आहे तशी ही आशा मावळतीये."

नेपाळ इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी आणि इंडिपेंडेंट पॉवर प्रोड्यूसर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार पांडे यांचे पती जिबलाल अधिकारी यांच्यासह जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित किमान 897 जण अद्याप बेपत्ता आहेत.

बचाव पथकांनी आठवड्याच्या शेवटी बोगद्याच्या आत ऑक्सिजन पुरवठा करायला सुरूवात केली होती. . मात्र, काही कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार हे काम आधीच सुरू करायला हवं होतं.

जीवन खडका यांचे नातेवाईकही प्रकल्पाच्या आत अडकले आहेत. त्यांनी 'कांतिपुर'शी बोलताना म्हटलं, "जितका जास्त वेळ जाईल, तितकी आमची आशा कमी होत जाईल. हे बचावकार्य अतिशय वेगाने पुढे जायला हवं, कारण आमच्यासाठी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. इथं काम खूपच संथ गतीने सुरू आहे."

ज्या लोकांनी वाचवले स्वतःचे प्राण...

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पूर आल्यानंतर मैलुंग जलविद्युत प्रकल्पात काम करणाऱ्या शिवा गिरी आणि इतर सहा जणांसमोर डोंगराच्या दिशेने चढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

त्यांच्या डोळ्यांसमोर घरं, वसाहती आणि इतर बांधकामं पुराच्या पाण्यात वाहून जात होती. रसुवा इथल्या मैलुंग जलविद्युत प्रकल्पातून ते डोंगराच्या दिशेने पळत सुटले.

गिरी यांनी 'नेपाळ न्यूज' या वेबसाइटला सांगितलं की, त्यांचे अनेक सहकारी पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यांच्या चुलत भावाचाही त्यात समावेश होता. शहरांकडे जाणारे नेहमीचे रस्ते पुरामुळे तुटल्यानंतर शिवा आणि त्यांचे सहकारी जवळपास 12 तास जंगलातून चालत राहिले. अखेर त्यांनी एका गुहेत रात्र काढली.

त्रिशूली-3ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्याजवळ बचावकार्य करणारे कर्मचारी

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, त्रिशूली-3ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्याजवळ बचावकार्य करणारे कर्मचारी

राष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDRRMA) माहितीनुसार, आतापर्यंत 279 जणांना बोगद्यांमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.

मैलुंग जलविद्युत प्रकल्पात तांत्रिक कर्मचारी असलेल्या गिरी यांनी सांगितलं की, दुसऱ्या दिवशी सकाळी ते आणि त्यांचे सहकारी डोंगरावरून खाली उतरला. तिथे त्यांनी विस्थापित म्हणून नोंदणी केली आणि मदतीची विनंती केली.

'नेपाळ न्यूज'च्या माहितीनुसार नेपाळी लष्कराच्या हेलिकॉप्टरने त्यांना काठमांडूला नेण्यात आलं. तिथे त्रिभुवन मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात गिरी यांच्यावर उपचार सुरू होते.

अपर त्रिशूली-1 प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनीही डोंगरावर चढून वाचवला जीव

अपर त्रिशूली-1 जलविद्युत प्रकल्पातील सिव्हिल इंजिनिअर संदीप राणा यांनीही पुराचं पाणी वाढत असताना 100 इतर कर्मचाऱ्यांसोबत डोंगरावर चढून आपला जीव वाचवला.

राणा यांनी सोमवारी (30 ऑगस्ट) 'द रायझिंग नेपाळ'ला सांगितलं की, ते प्रकल्पाच्या कार्यालयात असताना अचानक आपत्कालीन सायरन वाजला.

कर्मचारी ठरवून दिलेल्या सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याआधीच त्यांना प्रकल्पापासून जवळपास 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या धरणाच्या ठिकाणी मोठा पूर आल्याची माहिती मिळाली.

नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरात 900 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, जवळपास चार हजार जण बेपत्ता आहेत.
फोटो कॅप्शन, नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरात 900 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, जवळपास चार हजार जण बेपत्ता आहेत.

त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उंच ठिकाणाच्या दिशेने चढायला सुरुवात केली. अखेर ते त्रिशूली नदीच्या पाण्याच्या पातळीपासून सुमारे 30 ते 35 मीटर उंचीवरील एका ठिकाणी पोहोचले. तिथून त्यांनी प्रकल्पाचं कार्यालय, छावण्या आणि रस्ते पुराच्या पाण्यात वाहून जाताना पाहिले.

राणा यांनी सांगितलं, "आम्हाला सतत वर चढत राहावं लागत होतं आणि त्याच वेळी अंगावर येणाऱ्या दगडांपासूनही बचाव करावा लागत होता. थांबून विचार करण्यासाठीही वेळ नव्हता."

हे सगळे जण सात ते आठ तास चढत राहिले. संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास ग्रांग परिसरातील एका रस्त्यावर पोहोचले. राणा कालिकास्थान येथे पोहोचेपर्यंत त्यांच्यासोबत केवळ दोन जण राहिले होते. इतर जण वाटेतच त्यांच्यापासून वेगळे झाले होते.

बोगद्यात राहून कसा केला पुरापासून बचाव?

रामचंद्र नावाच्या आणखी एका व्यक्तीने त्रिशूली नदीच्या काठावर असलेल्या एका बोगद्यात राहून पुरापासून स्वतःचा बचाव केला.

'रातोपाटी' या वृत्तसंकेतस्थळाच्या माहितीनुसार, रामचंद्र आणि त्यांचे पाच सहकारी बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून काहीशे मीटर अंतरावर असतानाच बोगद्यात पाणी शिरायला सुरुवात झाली.

पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी बोगद्याच्या छताला लागून असलेली लोखंडी शिडी पकडली.

रामचंद्र यांनी सांगितलं की, आम्ही सहा जणांनी स्वतःला स्थिर ठेवण्यासाठी टिनच्या पत्र्याचा आधार घेतला आणि सुमारे सहा तास एका शिडीवरून दुसऱ्या शिडीपर्यंत पुढे सरकत राहिले.

ते म्हणाले, "आम्ही सहा जण होतो आणि नंतर बोगद्याच्या दरवाजाजवळ आम्हाला आणखी एक व्यक्ती दिसली."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)