कराचीचा मोहट्टा पॅलेस: हिंदू उद्योजकानं पत्नीसाठी बांधलेल्या महालाचा ताबा जिन्नांच्या बहिणीकडे कसा गेला?

कराचीमधला मोहट्टा पॅलेस
फोटो कॅप्शन, कराचीमधला मोहट्टा पॅलेस
    • Author, रशीद शकूर
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, कराचीमधून
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

कराचीचे लोक जेव्हा क्लिफ्टन समुद्रकिनाऱ्याकडे जातात, तेव्हा वाटेत त्यांना गुलाबी आणि पिवळ्या दगडांनी बांधलेली एक जुनी इमारत दिसते. या इमारतीकडं न पाहाता तिथून पुढं जाणं अवघड असतं.

कराचीतील या इमारतीचं नाव मोहट्टा पॅलेस आहे. या पॅलेसकडं पाहिलं की थेट जेव्हा समुद्राच्या गर्जना करणाऱ्या लाटा क्लिफ्टनच्या किनाऱ्यावर आदळत असत, अशा काळात आपण जाऊन पोहोचतो.

त्याच काळात एका हिंदू मारवाडी उद्योजकाच्या मनात समुद्राच्या अगदी जवळ ही इमारत उभारण्याची कल्पना आली होती. त्या उद्योजकाचं नाव शिवरतन चंद्ररतन मोहट्टा होतं. त्यांनी आपल्या पत्नीसाठी हा महाल बांधला होता.

हा महाल बांधण्यासाठी विशेषतः जोधपूरच्या गुलाबी दगडांचा वापर करण्यात आला होता.

रेल्वेमार्गही बांधला

कराचीवर संशोधन करणारे दिवंगत पत्रकार अख्तर बलोच, संशोधक इक्बाल ए. रहमान मांडविया आणि इतिहासकार उस्मान दमूही यांनी आपल्या लेखांमध्ये मोहट्टा पॅलेसबद्दल लिहिले आहे.

इक्बाल ए. रहमान मांडविया यांनी आपल्या पुस्तकात लिहितात, "शिवरतन मोहट्टा यांनी कराचीमध्ये लोखंडाचा कारखाना उभारला होता. याशिवाय त्यांनी सिंधमधील खदरोजवळ साखर कारखानाही सुरू केला होता.

मोहट्टा पॅलेस
फोटो कॅप्शन, मोहट्टा पॅलेस

साखर जवळच्या रेल्वे स्थानकापर्यंत सहज पोहोचवण्यासाठी त्यांनी लोहमार्गही बांधला होता. ही गोष्ट 1939 सालातली आहे."

शिवरतन मोहट्टा यांचे धाकटे भाऊ गोपाल गोरधनदास मोहट्टा यांनी कराचीमध्ये हिंदू जिमखाना उभारला होता.

अशा प्रकारे कराचीतील दोन महत्त्वाच्या ऐतिहासिक इमारतींसोबत मोहट्टा कुटुंबाचं नाव कायम स्मरणात राहिलं आहे.

प्रेमाचं प्रतीक, प्रेमाची कहाणी

मोहट्टा पॅलेस बांधण्यामागे शिवरतन मोहट्टा यांचा कोणताही व्यावसायिक हेतू नव्हता.

त्यांची पत्नी एका जीवघेण्या आजाराशी झुंज देत होती. डॉक्टरांनी शिवरतन मोहट्टा यांना सांगितलं होतं की या आजारावर ताजी हवा हा सर्वात चांगला उपाय आहे. अशा वातावरणात त्या राहिल्या तर त्यांची तब्येत सुधारेल.

प्रेमाचं प्रतीक, प्रेमाची कहाणी
फोटो कॅप्शन, मोहट्टा पॅलेस कराची

कराचीच्या समुद्र किनाऱ्याची ताजी हवा हा या समस्येवरील सर्वोत्तम उपाय आहे, हे शिवरतन मोहट्टा यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी येथे एक बंगला बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात हा बंगला एखाद्या राजवाड्यासारखाच होता.

आजही प्रेमकथांचा उल्लेख करताना असं म्हटलं जातं की मुघल बादशाह शाहजहानने आपल्या पत्नी मुमताज महलच्या मृत्यूनंतर तिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला. पण शिवरतन मोहट्टा यांना आपल्या पत्नीचं आयुष्य अधिक प्रिय होतं. त्यामुळे त्यांनी पत्नी जिवंत असतानाच हा महाल उभारला.

मोहट्टा पॅलेसची रचना

ही भव्य इमारत भारतीय उपखंडातील सुरुवातीच्या काळातील मुस्लीम वास्तुविशारदांपैकी एक असलेल्या अहमद हुसेन आगा यांच्या कौशल्यातून साकारली आहे.

या इमारतीचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांना खास जयपूरहून कराचीला बोलावण्यात आलं होतं.

त्यांनी कराचीतील हिंदू जिमखाना आणि चेंबर ऑफ कॉमर्ससारख्या इमारतींचेही आराखडे तयार केले होते. मात्र त्यांच्या कारकिर्दीतल्या कामांमध्ये मोहट्टा पॅलेसचं स्थान विशेष आहे.

 मोहट्टा पॅलेसमधील खिडकी
फोटो कॅप्शन, मोहट्टा पॅलेसमधील खिडकी

1927 मध्ये पूर्ण झालेला मोहट्टा पॅलेस मुघल वास्तुकलेची सुंदर झलक दाखवतो.

तो पाहताना असं वाटतं की राजस्थानी राजांच्या अँग्लो-मुघल महालांची पुन्हा निर्मिती करण्यात आली आहे.

या महालाच्या बांधकामात जोधपूरचा गुलाबी दगड आणि गिझरी भागातील स्थानिक पिवळा दगड वापरण्यात आला आहे.

 मोहतट्टा पॅलेसच्या भिंतींवरील नक्षीकाम
फोटो कॅप्शन, मोहट्टा पॅलेसच्या भिंतींवरील नक्षीकाम

मोहट्टा पॅलेस कोणत्याही बाजूने पाहिला तरी तो लोकांचं लक्ष वेधून घेतो.

त्याचे घुमट त्याचं सौंदर्य अधिक खुलवतात. कमानी, मिनार आणि नक्षीदार टाइल्सही पाहण्यासारख्या आहेत.

या इमारतीत बर्मा टीकचं मजबूत लाकूड वापरण्यात आलं आहे.

दगडांवर मोर आणि फुलांच्या नक्षी कोरण्यात आल्या आहेत. विशेष करुन त्यामध्ये झेंडूची फुलं दिसतात.

एकेकाळी याच्या छतावर एक छोटंसं मंदिरसुद्धा होतं.

कालांतराने या परिसरात उंच इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे आता मोहट्टा पॅलेसच्या छतावरून दिसणारं समुद्राचं दृश्य पूर्वीसारखं सुंदर दिसत नाही.

एकेकाळी येथून समुद्राचं अत्यंत देखणं दृश्य दिसत असे.

ते भुयार कुठं गेलं?

मोहट्टा पॅलेसमध्ये एक भुयारही होतं. हे भुयार जवळच्या मंदिरापर्यंत जात असे.

महालात राहणारे लोक या भुयारातून मंदिरात जाऊन पूजा-अर्चना करत असत.

मात्र कालांतरानं या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम झालं. त्यानंतर ते बंद करण्यात आलं.

पाकिस्तान स्थापन झाल्यानंतर काय घडलं?

पाकिस्तानचे राजकारणी कुंवर खालिद युनूस यांनी 'डॉन' वृत्तपत्राला लिहिलेल्या एका पत्रात 2004 मधील भारत भेटीदरम्यान एका वृद्ध व्यक्तीशी झालेल्या भेटीचा उल्लेख केला आहे.

त्या वृद्ध व्यक्तीनं त्यांना सांगितलं की, एका प्रभावशाली राजकीय व्यक्तीनं सेठ शिवरतन मोहट्टा यांना पॅलेस रिकामा करण्यास सांगितलं होतं. तिथं सरकारी कार्यालयं स्थापन केली जाणार असल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं.

मोहट्टा पॅलेसमधलं लाकडी नक्षीकाम
फोटो कॅप्शन, मोहट्टा पॅलेसमधलं लाकडी नक्षीकाम
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कुंवर खालिद युनूस यांच्या मते, त्यानंतर शिवरतन मोहट्टा यांनी पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी महालाच्या किल्ल्या आपल्या व्यवस्थापकाकडे दिल्या. त्याचबरोबर एक चिठ्ठी लिहून ती त्या राजकीय व्यक्तीला देण्यास सांगितलं.

त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, जर त्यांना केवळ विनंती करण्यात आली असती तरीही त्यांनी हा पॅलेस भेट म्हणून दिला असता. मात्र त्यांना तो रिकामा करण्याचा आदेश देण्यात आला.

खरं तर पाकिस्तान स्थापन झाल्यानंतर शिवरतन मोहट्टा कराचीमध्येच राहू इच्छित होते. पण परिस्थितीच अशी निर्माण झाली की त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.

याविषयी पाकिस्तानचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सय्यद हाशिम रझा यांनी त्यांच्या 'हमारी मंज़िल' या पुस्तकाच्या 96 आणि 97 क्रमांकाच्या पानांवर लिहिलं आहे:

"शिवरतन मोहट्टा अतिशय श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जात होते. कराचीमध्ये त्यांची अनेक घरं होती, पण त्यांना मोहट्टा पॅलेसमध्ये राहणं अधिक आवडायचं."

"परराष्ट्र मंत्रालयाचं कार्यालय बनवण्यासाठी ही इमारत निवडण्यात आली होती."

"14 ऑगस्टच्या संध्याकाळी अल्पसंख्याक समाजातील प्रमुख व्यक्तींना गव्हर्नर जनरल हाऊसमध्ये बोलावण्यात आलं होतं. त्यामध्ये शिवरतन मोहट्टा यांचाही समावेश होता."

"ते मोहम्मद अली जिन्ना यांच्याकडे गेले आणि पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल बनल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलं. जिन्नांनीही त्यांच्याशी मनापासून हस्तांदोलन केलं."

"शिवरतन मोहट्टा यांना वाटलं की मोहट्टा पॅलेस परत मिळवून देण्याची विनंती करण्यासाठी ही योग्य वेळ आहे."

क्लिफ्टन बिच, कराची
फोटो कॅप्शन, क्लिफ्टन बिच, कराची

"मोहट्टा पॅलेस सरकारी कार्यालयांसाठी कसा निवडला गेला हे त्यांनी मला म्हणजे हाशिम रझा यांना, मोहम्मद अली जिन्ना यांना सांगण्यास सांगितलं."

"ज्यांच्याकडे राहण्यासाठी एकापेक्षा जास्त घरं आहेत, आम्ही फक्त अशाच लोकांची घरं निवडली आहेत, असं मी जिन्नांना सांगितलं."

"मी त्यांना सांगितलं की मोहट्टा यांच्याकडे कराचीमध्ये अनेक घरं आहेत आणि ते दुसऱ्या घरात राहू शकतात."

"मोहट्टांनी उत्तर दिलं की हा त्यांचं सर्वात आवडतं घर आहे."

"त्यांनी मोहम्मद अली जिन्ना यांच्याकडे विनंती केली. पण जिन्नांनी माफी मागत सांगितलं की या प्रकरणात निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही."

"त्यांनी सांगितलं की ज्यांच्याकडे अधिकार आहे, त्यांच्याकडेच विनंती करावी."

"हे ऐकून शिवरतन मोहट्टा आश्चर्यचकित झाले होते."

पाकिस्तान स्थापन झाल्यानंतर आगा हिलाली तेथील मुख्य प्रोटोकॉल अधिकारी होते.

त्यांनी लिहिलं आहे की मोहट्टा पॅलेसमध्ये परराष्ट्र मंत्रालयाची कार्यालयं स्थापन करण्यात आली होती. मात्र शहरापासून दूर असल्याने कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यास अडचणी येत होत्या.

या समस्येवर उपाय म्हणून सदरमधील एम्प्रेस मार्केटपासून बससेवा सुरू करण्यात आली. ही बस कर्मचाऱ्यांना मोहट्टा पॅलेसपर्यंत आणत असे आणि पुन्हा परत नेत असे.

त्या काळात क्लिफ्टन भागात फारच कमी लोकसंख्या होती. तिथं समुद्राचं पाणी आणि वाळू एवढंच दिसत असे.

राजधानी कराचीहून इस्लामाबादला हलवल्यानंतर मोहट्टा पॅलेस ओसाड पडला.

जिन्नांच्या बहिणीचं वास्तव्य

"क्लिफ्टनला जाताना वाटेत दिसणाऱ्या या पॅलेसबद्दल आपल्या वडिलांना विचारणारा मी एकटाच मुलगा नव्हतो."

"यावर उत्तर मिळायचं की इथं पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांची बहीण फातिमा जिन्ना राहतात."

हे एक साधं आणि सरळ उत्तर होतं. माझ्यासारख्या अनेक मुलांना क्लिफ्टनला जाताना या इमारतीबद्दल प्रश्न पडायचा आणि त्यांना हेच उत्तर मिळायचं.

फातिमा जिन्ना यांनी मोहम्मद अली जिन्नांच्या मुंबईतील घराच्या बदल्यात मोहट्टा पॅलेसची निवड केली होती.

जिन्नांच्या बहिणीचं वास्तव्य
फोटो कॅप्शन, मोहम्मद अली जिन्ना आणि फातिमा जिन्ना

सुरुवातीला त्यांनी या इमारतीत विशेष रस दाखवला नव्हता. मात्र नंतर त्या येथे राहू लागल्या.

जेव्हा ही इमारत फातिमा जिन्ना यांच्याकडे सोपवण्यात आली, तेव्हा तिची अवस्था अत्यंत खराब होती.

इमारतीची साफसफाई करण्यात आली. पक्ष्यांची घरटी आणि कोळ्यांची जाळी काढून टाकण्यात आली.

त्यामुळे काही काळासाठी मोहट्टा पॅलेसचं नाव 'कस्र-ए-फातिमा' पडलं.

फातिमा जिन्ना यांच्या मैत्रीण बेगम शाइस्ता इकरामुल्लाह यांनी 'डॉन'ला दिलेल्या मुलाखतीत जुन्या आठवणी सांगितल्या होत्या.

त्या लिहितात:

"एका संध्याकाळी फातिमा जिन्ना मला मोहट्टा पॅलेसच्या गच्चीवर घेऊन गेल्या. तेथून समुद्राचं दृश्य अतिशय सुंदर दिसत होतं."

"फातिमा जिन्ना जेव्हा पहिल्यांदा येथे राहायला आल्या, तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की ही जागा खूप मोठी नाही का?"

"त्यांनी उत्तर दिलं, नाही, मला ही जागा आवडते."

"तो गुरुवारचा दिवस होता. त्यांनी महालात रात्रीचं जेवण केलं."

"लेडी हिदायतुल्लाह यांच्या मते, त्या रात्री अब्दुल्ला शाह गाझी यांच्या दर्ग्यावर कव्वालीचा कार्यक्रम होता. ते सर्वजण रात्रभर तिथे कव्वाली ऐकत बसले होते."

अयूब खान यांच्याविरोधात निवडणूक

फातिमा जिन्ना यांनी लष्करी शासक अयूब खान यांच्या विरोधात राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली होती.

तोपर्यंत मोहट्टा पॅलेस 'कस्र-ए-फातिमा' बनला होता. त्या काळात तो फातिमा जिन्ना यांच्या निवडणूक प्रचाराचा आणि आंदोलनाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू होता.

फातिमा जिन्ना सुमारे साडेतीन वर्षं मोहट्टा पॅलेसमध्ये राहिल्या. याच ठिकाणी त्यांचं निधन झालं.

त्यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, असं मानलं जातं.

फातिमा जिन्ना जिवंत असेपर्यंत आपले प्रिय बंधू मोहम्मद अली जिन्ना यांच्या स्मृतिदिनाचं नियमित आयोजन करत असत.

त्या बोहरा समाजातील एका खास स्वयंपाक्याकडून बिर्याणी बनवून घेत आणि लोकांना जेवण देत असत.

मोहट्टा पॅलेसमधील त्यांच्या अनेक वैयक्तिक वस्तू आणि दोन मोटारी आता फ्लॅग स्टाफ हाऊस संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.

मालकी हक्काचा वाद

फातिमा जिन्ना यांच्या निधनानंतर त्यांची बहीण शिरीन जिन्ना मोहट्टा पॅलेसमध्ये राहू लागल्या.

1980 मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्या तिथेच राहिल्या. मात्र त्याआधीच पॅलेसच्या मालकी हक्कावरून वाद सुरू झाला होता आणि प्रकरण न्यायालयात पोहोचलं होतं.

या वादाचा परिणाम असा झाला की न्यायालयाच्या आदेशानुसार मोहट्टा पॅलेस सील करण्यात आला.

मोहट्टा पॅलेसमध्ये मुलींसाठी वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावं, अशी शिरीन यांची इच्छा होती.

त्यासाठी त्यांनी ट्रस्टही स्थापन केला होता. मात्र त्यांच्या नातेवाईकांनी या इमारतीवर मालकी हक्काचा दावा केला.

ऑक्टोबर 2021 मध्ये सिंध उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठानेही येथे मुलींसाठी वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश दिले.

मात्र कायदेशीर अडचणींमुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.

1995 मध्ये बेनझीर भुट्टो यांच्या सरकारने सिंध सरकारला मोठी आर्थिक मदत दिली, त्यातून मोहट्टा पॅलेस विकत घेण्यात आला.

त्यानंतर त्याच्या व्यवस्थापनासाठी सामाजिक क्षेत्रातील लोकांचं विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात आलं.

आजही हे विश्वस्त मंडळ मोहट्टा पॅलेसचं सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून संचालन करत आहे.

जेव्हा मोहट्टा पॅलेस सिंध सरकारच्या ताब्यात आला, तेव्हा त्याची अवस्था अत्यंत खराब होती.

त्यानंतर त्याच्या दुरुस्तीचं आणि सुशोभीकरणाचं काम सुरू करण्यात आलं. येथे संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 1999 मध्ये ते सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं.

मोहट्टा पॅलेस अनेक वर्षं बंद असल्याने त्याबद्दल विविध अफवा पसरल्या होत्या.

तो भुताटकीचा बंगला आहे आणि तिथे भूत-समंध राहतात, असंही म्हटलं जायचं. अनेक लोक त्या ठिकाणाजवळून जातानादेखील घाबरत असत.

मोहट्टा पॅलेस संग्रहालयात काय आहे?

मोहट्टा पॅलेसमधील संग्रहालयात छायाचित्रण आणि व्हीडिओ चित्रीकरणाला परवानगी नाही.

मात्र संग्रहालय प्रशासनानं बीबीसी हिंदीला छायाचित्रं काढण्याची विशेष परवानगी दिली.

हे संग्रहालय पॅलेसच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर आहे.

या पॅलेसच्या आवारात कराचीतले जुने पुतळे आणून ठेवण्यात आले आहेत.
फोटो कॅप्शन, या पॅलेसच्या आवारात कराचीतले जुने पुतळे आणून ठेवण्यात आले आहेत.

येथील छायाचित्रं आणि दुर्मिळ वस्तूंमधून केवळ सिंधच नव्हे, तर संपूर्ण प्रदेशातील विविध प्राचीन संस्कृतींबद्दल माहिती मिळते.

येथे दागदागिने, नाणी, कपडे आणि विविध हस्तकलेच्या वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानच्या सुरुवातीच्या काळातील चलनी नोटादेखील येथे आहेत. त्यांपैकी काही नोटांची नोंद स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या अभिलेखातही नसल्याचं सांगितलं जातं.

या पॅलेसच्या आवारात कराचीतले जुने पुतळे आणून ठेवण्यात आले आहेत.

मोहट्टा पॅलेसमधील धातू आणि दगडांच्या मूर्तीही पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. यामध्ये महाराणी व्हिक्टोरिया यांच्या पुतळ्याचाही समावेश आहे.

मात्र आता या मूर्ती झाकून ठेवण्यात आल्या आहेत. विशेष प्रसंगीच त्या उघडल्या जातात.

हे पुतळे पूर्वी शहरातील विविध ठिकाणी उभे होते. आता त्यांना येथे आणून ठेवण्यात आलं आहे.

मोहट्टा पॅलेसमध्ये आता नियमितपणे ललितकलेची प्रदर्शनं भरवली जातात आणि मुशायर्‍यांचं आयोजनही केलं जातं.

आज क्लिफ्टन परिसरात अनेक देशांची वाणिज्य दूतावास आहेत.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांचं प्रसिद्ध '70 क्लिफ्टन' हे निवासस्थानदेखील याच भागात आहे.

मात्र इतका प्रदीर्घ काळ लोटून गेल्यानंतरही मोहट्टा पॅलेसमध्ये असलेलं आकर्षण आणि गूढ मोहिनी इतर कोणतीही इमारत निर्माण करू शकलेली नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)