भारताचा न्यूझीलंडवर विजय, अभिषेक शर्माचे 35 बॉलमध्ये शतक

Caption - अभिषेक शर्माने अवघ्या 35 बॉलमध्ये शतक झळकावले.
फोटो कॅप्शन, अभिषेक शर्माने अवघ्या 35 बॉलमध्ये शतक झळकावले.
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात वादळी शतक झळकावले. या खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडला 6 विकेटने पराभूत केले. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतली.

वेलिंग्टनमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात त्याने अवघ्या 35 बॉलमध्ये शतक झळकावले.

अभिषेकने या खेळीत 10 षटकार आणि 8 चौकार मारले.

आयसीसी पूर्ण सदस्य देशाच्या फलंदाजाने केलेल्या सर्वात जलद शतकाचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध 30 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.

दरम्यान, याआधी वैभव सूर्यवंशी 19 चेंडूंमध्ये 45 धावा करून बाद झाला.

भारताने न्यूझीलंडविरुद्धचे 199 धावांचे लक्ष्य अगदी सहज गाठले.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 198 धावा केल्या.

न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली, तर फिन ॲलनने 40 धावांचे योगदान दिले.

भारताच्या गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि नितीश कुमार रेड्डी यांचा समावेश होता. त्यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. दुसरीकडे, प्रिन्स यादवने आपल्या 4 षटकांत 44 धावा दिल्या. या कोणत्याही भारतीय गोलंदाजाने दिलेल्या सर्वाधिक धावा आहेत.

अभिषेक शर्माचे रेकॉर्ड

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 2,000 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अभिषेक शर्मा 193.36 च्या स्ट्राईक रेटने अव्वल स्थानी आहे.

त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज होण्याचा विक्रमही केला. त्याने पॉवरप्लेमध्ये 98 षटकार मारणाऱ्या रोहित शर्माला मागे टाकले.

Caption - टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज होण्याचा विक्रमही अभिषेक शर्माच्या नावावर आहे.
फोटो कॅप्शन, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज होण्याचा विक्रमही अभिषेक शर्माच्या नावावर आहे.

एवढेच नाही तर, अभिषेक 2026 मध्ये सलामीवीर म्हणून 1,000 टी-20 आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याने केवळ 1,024 बॉलमध्ये 2,000 टी-20 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करून एक विश्वविक्रमही केला. यापूर्वी हा विक्रम सूर्यकुमार यादवच्या नावावर होता. त्याने 1,164 बॉलमध्ये हा टप्पा गाठला होता.

3–4 वर्षांचा असतानाच वडिलांनी दिली प्लास्टिकची बॅट

अभिषेक शर्माच्या प्रवासावर बीबीसी मराठीने लेख लिहिला होता, त्यानुसार सांगितले होते की अभिषेक जेव्हा तीन-चार वर्षांचा होता. तेव्हा त्याने वडिलांची जड बॅट उचलण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे वडिलांनी त्याला प्लास्टिकची बॅट आणून दिली होती.

अभिषेकचे कुटुंब हे पंजाबमधील अमृतसर येथील आहे.

राजकुमार शर्मा बीबीसीशी बोलताना म्हणाले होते, "मी स्वतः क्रिकेट खेळत होतो, त्यामुळे घरात माझं क्रिकेटचं साहित्य आणि किट इकडे-तिकडे पसरलेलं असायचं. अभिषेकचं त्यावेळी वय साधारण तीन–चार वर्षे असावं, तेव्हा तो माझी बॅट उचलण्याचा प्रयत्न करत असत. बॅट जड असल्यामुळे त्याला ती उचलता येत नव्हती. मग मी त्याला प्लास्टिकची बॅट आणून दिली."

अभिषेक शर्माचे वडील हे त्याचे प्रशिक्षकही आहेत.
फोटो कॅप्शन, अभिषेक शर्माचे वडील हे त्याचे प्रशिक्षकही आहेत.

"त्या बॅटसह तो खूप शॉट मारत असे. त्याचा आवाजही नीट निघत नसला तरी तो म्हणायचा, 'पप्पा, बॉल टाका'. आपल्या बहिणींना सांगायचा, 'बॉल फेका,' आणि रात्री माझ्या पत्नीला सांगायचा, 'बॉलिंग कर.' अशा प्रकारे तो सतत बॅटिंग करत करत, त्याच्या क्रिकेटबद्दलच्या आवडीने त्याला इथंपर्यंत पोहोचवलं," असंही त्यांनी नमूद केलं होतं.

क्रिकेटची प्रचंड आवड, मेहनत आणि आपल्या बॅटिंगच्या जोरावर आता अभिषेक शर्मा जगातील अव्वल फलंदाजांमध्ये गणला जात आहे.

अभिषेक शर्माचा प्रवास

अभिषेक शर्माचे वडील बँकेत काम करायचे आणि क्रिकेटही खेळायचे. त्याच्या घरात आई, दोन मोठ्या बहिणी आहेत. एक बहीण शिक्षिका आहे, तर दुसरी डॉक्टर.

शर्मा जुने दिवस आठवतात, "मी जेव्हा मैदानावर जायचो, तेव्हा तो माझ्यासोबतच यायचा. मी मोठ्या मुलांना ट्रेनिंग देत असे, कोचिंग देत असे. मोठी मुलं अभिषेककडे पाहून म्हणायचे, 'तुमच्या मुलामध्ये खूप टॅलेंट आहे."

"त्याची बॅट सरळ येते, तो सरळ शॉट मारतो आणि जोरात मारतो. असं वाटतं की तो मोठा खेळाडू होऊ शकतो. जेव्हा मी त्याचा जोश आणि त्याची आवड पाहिली, तेव्हा ठरवलं की त्याला क्रिकेटर बनवायचं. मी सिलेक्टर होतो, रेफ्री होतो, कोच होतो, पण जेव्हा त्याला पाहिलं, तेव्हा ठरवलं की मीच त्याला कोचिंग देईन."

अभिषेकला अभ्यासातही गती होती. त्याला उत्तम मार्क्स मिळत असत.

राजकुमार शर्मा यांनी बीबीसीला सांगितलं की, "तो अभ्यासात खूप हुशार होता. तो स्पर्धा किंवा टूर्नामेंटमध्ये असला तरीही पेपर द्यायचा आणि उत्तम गुण मिळवायचा. कोणत्याही वर्गात त्याला कमी गुण मिळाले नाहीत. त्याने बीएपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे."

अभिषेकच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अभिषेकच्या आयुष्यात तो टर्निंग पॉइंट कधी आला, तो प्रोफेशनल सेटअपमध्ये कधी आला आणि शुभमन गिलशी त्याची मैत्री इतकी घट्ट कशी झाली?

खरं म्हणजे, काही वर्षांपूर्वी पंजाब क्रिकेट असोसिएशनने अंडर-12 आणि अंडर-14 संघ तयार केले होते आणि एक प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं. नवीन मुलांना पुढं आणायचा उद्देश होता. त्याचे प्रमुख होते डी. पी. आजाद. ते कपिल देव यांचे गुरू होते. पंजाब क्रिकेटमध्ये त्यांना खूप आदर होता.

यासाठी संपूर्ण पंजाबमधून 30 मुलं निवडली गेली. त्या वेळी अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल अजून लहान होते.

राजकुमार शर्मा म्हणतात, "हे दोघे खूप लहान होते. आजाद यांनीही सांगितलं की या दोघांमध्ये नैसर्गिक प्रतिभा आहे. मी मुलांना भेटायला गेलो, त्यांचा सामना पाहिला, तेव्हा आजाद आणि अरुण बेदीही तिथे होते. बेदी हे मला बाजूला घेऊन म्हणाले की, '30 मुलांमध्ये हे दोघे खास आहेत. लिहून ठेव, हे दोघं भारतासाठी खेळतील आणि ओपनिंगही करतील.'"

"यानंतर आजाद हेही आले. ते माझे गुरू आहेत, मी त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि ते म्हणाले, 'तुझ्या मुलामध्ये खूप टॅलेंट आहे, तो जेव्हा बॅटिंगसाठी येतो, मी पाहतच राहतो. ही असामान्य मुलं आहेत. आयुष्यभर माझी ही गोष्ट लक्षात ठेव, हे दोघंही भारताच्या टीमकडून खेळतील."

क्रिकेट तज्ज्ञांना अभिषेक शर्मामध्ये वीरेंद्र सेहवागची आक्रमकता आणि युवराज सिंगच्या फटकेबाजीची सुंदर शैली दिसते.
फोटो कॅप्शन, क्रिकेट तज्ज्ञांना अभिषेक शर्मामध्ये वीरेंद्र सेहवागची आक्रमकता आणि युवराज सिंगच्या फटकेबाजीची सुंदर शैली दिसते.

या दोन प्रशिक्षकांच्या बोलण्यामुळे राजकुमार शर्मांचा निर्धार आणखी मजबूत झाला. त्यांनी आणि अभिषेकने रात्रंदिवस मेहनत केली. ते बँकेत काम करत होते, पण सुटी घेऊन अभिषेकला ट्रेनिंग देत होते.

जेव्हा अभिषेक अंडर-14 संघात होता, तेव्हा त्याचे वडील 130 ते 140 किलोमीटर प्रती तास वेगाने बॉल टाकायचे. इतर प्रशिक्षक म्हणायचे, 'इतक्या वेगानं का टाकतोयस?' तर अभिषेक त्याच्या वडिलांना म्हणायचा, 'आणखी वेगाने बॉल टाका, मी खेळायला तयार आहे.'

अभिषेक शर्मा अंडर-16 मध्ये पंजाबचा कर्णधार होता. एका सत्रात त्यानं 1200 धावा केल्या आणि 57 विकेट घेतल्या, ज्यामुळे बीसीसीआयने त्याला नमन पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.

यानंतर त्याला अंडर-19 नॉर्थ झोनचा कर्णधार करण्यात आलं आणि त्याचा संघ जिंकला. त्यानंतर तो नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये गेला, जिथे राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या प्रतिभेत आणखी सुधारणा झाली.

पुढे जाऊन अभिषेक अंडर-19 भारताचा कर्णधार झाला आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने श्रीलंकामध्ये झालेला आशिया कप जिंकला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)