'जौहर' च्या वक्तव्यावर झालेल्या वादानंतर स्वरा भास्करचे स्पष्टीकरण, काय आहे नेमका वाद?

स्वरा भास्कर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्वरा भास्करला 2018 मध्ये पद्मावत चित्रपटाबद्दल लिहिलेल्या खुल्या पत्रावर प्रश्न विचारण्यात आला होता.
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

अभिनेत्री स्वरा भास्करने एक वक्तव्य केल्यानंतर वाद पेटला होता. त्यानंतर आता तिने स्पष्टीकरण दिले आहे.

31 ऑगस्ट रोजी दिल्लीतील एका कार्यक्रमात स्वरा भास्करला संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने हे वक्तव्य केलं होतं.

या वक्तव्यानंतर स्वरा भास्करला आता सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

स्वरा भास्करने 'जौहर करणाऱ्या महिलांना भ्याड म्हटलं होतं,' असा दावा सोशल मीडियावर अनेक युजर्सनी केला आहे.

स्वरा भास्करने नेमकं काय म्हटलं होतं?

दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये झालेल्या 'वुमन लाइफ फ्रीडम टॉक' कार्यक्रमात स्वरा भास्करने पद्मावतमधील जौहरच्या दृश्याबद्दल बोलताना सांगितलं की, "चित्रपटात 800 महिला जौहर करताना दाखवल्या आहेत. हे दृश्य पाहताना माझ्या मनात विचार आला की, समजा मी बलात्कारातून वाचलेली महिला असते, तर या चित्रपटाने मला काय संदेश दिला असता? स्वतःचा सन्मान वाचवण्यासाठी मी जीव दिला नाही तर मला लाजीरवाणं किंवा ते भ्याड कृत्य वाटलं असतं का?

"तुम्हाला आपल्यासारख्या समाजात हाच संदेश द्यायचा आहे का, जिथे बलात्काराच्या घटना आधीच साथीच्या रोगासारख्या वाढत आहेत? बलात्कार प्रकरणातील सर्व्हायवर महिलांना आपण असं सांगण्याचा प्रयत्न करत आहोत का की, त्यांना जगण्याचा काहीच अधिकार नाही? की त्या सन्मानानीय आणि धाडसी महिला असत्या, तर त्यांनी स्वतःचा जीव दिला असता?"

"आपण एखाद्या महिलेला असं सांगण्याचा प्रयत्न करत आहोत का की, बलात्कार झाला म्हणजे तिचं आयुष्य संपलं? या गोष्टी अत्यंत त्रासदायक आहेत."

स्वरा भास्कर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्वरा भास्कर

वादानंतर स्वरा भास्करने काय म्हटलं?

आपल्या वक्तव्यावरून वाद झाल्यानंतर स्वरा भास्करने आता स्पष्टीकरण दिलं आहे. तिने 'एक्स'वर एक व्हीडिओ शेअर करून या संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ती म्हणाली, "सोशल मीडियावर माझ्या एका कार्यक्रमातील एक व्हीडिओ क्लिप व्हायरल होत आहे. मला संजय लीला भन्साळी सरांना पद्मावत चित्रपटाबद्दल लिहिलेल्या खुल्या पत्राबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. ते पत्र मी का लिहिलं, याचं कारण मी सांगत होते. त्यावेळी मी काही बोलले होते, पण आता त्याचा पूर्णपणे चुकीचा अर्थ लावला जात आहे."

ती म्हणाली, "मी राणी पद्मावती आणि जौहर करणाऱ्या इतर महिलांना भित्र्या किंवा भ्याड म्हटलं, असा खोटा दावा केला जात आहे. मी स्पष्टपणे सांगते की, मी राणी पद्मावतींना कधीही भ्याड म्हटलेलं नाही. जौहर करणाऱ्या इतर राण्यांनाही मी भ्याड म्हटलं नाही."

"मी नेमकं काय म्हटलं होतं, ते इंग्रजीत होतं. त्याचा अर्थ मी स्वतः सांगते. एखादी भाषा समजत नसेल, तर आधी विचारून घ्यावं आणि खात्री करून घ्यावी. मनाने खोट्या गोष्टी तयार करून त्या पसरवू नयेत आणि लोकांना चिथावणी देऊ नये. ज्यांना मला शिव्या द्यायच्या आहेत, त्यांनी द्याव्यात, पण योग्य कारणासाठी द्याव्यात."

ती म्हणाली, "मी नेमकं काय म्हटलं होतं? चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहताना माझ्या मनात विचार आला की, देव न करो, पण समजा मी बलात्कार सर्व्हायवर असते आणि तरीही जिवंत राहिले असते, तर मला भ्याडपणासारखं वाटलं असतं का? म्हणजे बलात्कारानंतर मी जिवंत राहिले, तर मी भित्री आहे, असं मला वाटलं असतं. मी असं का म्हटलं? कारण आपला समाज असा आहे, जिथे बलात्काराच्या घटना एखाद्या साथीच्या रोगासारख्या पसरल्या आहेत."

"कालच दिल्लीत एका मुलीवर अतिशय क्रूरपणे सामूहिक बलात्कार झाला. एका गाडीत त्या तरुणीवर 46 किलोमीटरपर्यंत सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही आपल्या देशाची आजची वास्तविकता आहे."

"अशा चित्रपटांमधून आपण असा संदेश द्यायचा का की, महिलेच्या शरीराची पावित्र्यता तिच्या आयुष्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे? बलात्कारातील सर्व्हायवर असलेल्या महिलांना आपण असा संदेश द्यायचा का की, तुमचा जीव गेला असता तर बरं झालं असतं म्हणजेच त्यांचं जिवंत राहणं चुकीचं आहे?"

"माझा प्रश्न एवढाच आहे की, बलात्कार झाला म्हणून एखाद्या महिलेचं आयुष्य संपलं पाहिजे का? लक्षात ठेवा की, निर्भया धाडसी मुलगी शेवटच्या क्षणापर्यंत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या 6 जणांशी लढली. तिला जगण्याची प्रबळ इच्छा होती. त्या 6 जणांनी तिच्यावर अत्यंत अमानुष अत्याचार केला, परंतु तरीही ती शेवटपर्यंत लढत राहिली. त्यामुळे महिलांच्या जगण्याच्या इच्छेला आणि त्यांच्या आयुष्य जगण्याच्या हक्काला कधीही कमी लेखू नका."

स्वरा भास्कर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्वरा भास्कर

स्वरा भास्करने 2018 मध्ये नेमकं काय लिहिलं होतं?

या कार्यक्रमात स्वरा भास्करला संजय लीला भन्साळी यांना लिहिलेल्या खुल्या पत्राबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

स्वरा भास्करने सांगितलं की, तिने हा चित्रपट पाहिल्यानंतर लगेच नाही, तर 5 दिवसांनी हे खुलं पत्र लिहिलं होतं. तिच्या या पत्रावरून मोठा वाद निर्माण झाला आणि सोशल मीडियावर अनेक लोकांनी तिच्यावर टीका केली होती.

त्या पत्रातही स्वरा भास्करने चित्रपटातील जौहरच्या दृश्यावर तीव्र आक्षेप नोंदवला होता.

स्वरा भास्कर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्वरा भास्कर

या भव्य चित्रपटाच्या शेवटी तिला वाटलं की तिचं अस्तित्व फक्त एका 'योनी'पुरतंच मर्यादित राहिलं आहे, असं स्वराने पत्रात म्हटलं होतं.

स्वराचं म्हणणं होतं की, पद्मावत हा महिलाविरोधी चित्रपट आहे. या चित्रपटातून अनेक वर्षांपासून चालत आलेल्या चुकीच्या आणि भेदभाव करणाऱ्या विचारांना प्रोत्साहन मिळतं.

"तुमचा हा चित्रपट आपल्यासमोर जुन्या काळातील किंवा अंधकारमय युगातील तोच प्रश्न उभा करतोय- विधवा, वृद्ध, गर्भवती आणि बलात्कार झालेल्या महिलांना जगण्याचा अधिकार आहे का?", असं तिने या पत्रात लिहिलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)