एका म्हशीला दोन मालक, शेवटी म्हैस पोहोचली पोलीस ठाण्यात; आता DNA टेस्ट ठरवणार म्हैस कुणाची!

    • Author, मिर्झा ए. बी. बेग
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

माणसांची खरी ओळख पटवण्यासाठी, कौटुंबिक नातेसंबंध शोधण्यासाठी किंवा गुन्हेगारी तपासात डीएनए टेस्ट केली जाणे हे आता काही नवीन राहिलेलं नाही. पण बिहारमध्ये एक अजबच प्रकरण समोर आले आहे.

येथे एका म्हशीवरून दोन मालकांमध्ये असा काही वाद पेटला की खरा मालक कोण हे ठरवण्यासाठी पोलिसांना थेट त्या म्हशीचीच डीएनए टेस्ट करावी लागली आहे.

झालं असं की, बिहारच्या सिओत्रा गावातील सूरज यादव आणि शेजारच्या गावातील प्रकाश मांझी दोघेही छातीठोकपणे "ही म्हैस माझीच!" असा दावा करत होते.

पाहता पाहता या म्हशीच्या भांडणाला चक्क राजकीय रंग चढला आणि प्रकरण चांगलेच तापले. हा वाद असा चिघळत चाललेला पाहून स्थानिक आयजी विकास वैभव यांनी मध्यस्थी करत वैज्ञानिक पद्धतीने या प्रकरणाचा तातडीने छडा लावण्याचे आदेश दिले.

यानंतर अखेर असा तोडगा काढण्यात आला की, त्या चोरीला गेलेल्या म्हशीची आणि तिचे पिल्लू या दोघांची थेट डीएनए टेस्ट केली जाईल जेणेकरून मालकी हक्काचा हा तिढा कायमचा सुटेल.

दुसरीकडे, सूरज यादव नावाच्या व्यक्तीचा असा दावा आहे की त्याची म्हैस काही दिवसांपूर्वी अचानक गायब झाली होती. त्याने याप्रकरणी पोलिसांत कोणतीही तक्रार दिली नव्हती, तर स्वतःच म्हशीचा शोध सुरू केला होता.

विशेष म्हणजे त्या हरवलेल्या म्हशीचे लहान पिल्लू अजूनही आपल्याच ताब्यात असल्याचा दावा सूरज यादवने केला आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांनंतर सूरज यादवला समजले की, ती म्हैस शेजारच्या गावातील प्रकाश मांझी नावाच्या एका व्यक्तीच्या घरी बांधलेली आहे.

सूरज यादवने थेट तिथे धडक मारली आणि म्हशीला सोडून तो आपल्या घरी घेऊन आला.

दुसऱ्या बाजूला, प्रकाश मांझीचे असे ठाम मत आहे की, ती म्हैस कायदेशीररीत्या त्याचीच मालकीची संपत्ती आहे आणि तोच तिचा खराखुरा मालक आहे.

दोघांमधील भांडण खूप वाढल्यामुळे पोलिसांनी थेट म्हशीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून बांधले.

सुरुवातीला पोलिसांनी नेहमीचा देशी तोडगा वापरून पाहिला. म्हशीला मोकळे सोडून द्यायचे, म्हणजे ती चालत चालत स्वतःच आपल्या खऱ्या मालकाच्या घरी जाईल, अशी पोलिसांची योजना होती.

या प्रकरणाला राजकीय वळण कसे मिळाले?

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी म्हशीला सोडल्यावर ती चालत थेट सूरज यादव यांच्या घरी गेली. मात्र प्रकाश मांझी यांना हा तोडगा मान्य नव्हता आणि त्यांनी याविरोधात पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवली. तर दुसरीकडे म्हशीचे पिल्लू आपल्याच अंगणात बांधलेले असल्याचे सांगत सूरज यादव आपल्या दाव्यावर ठाम राहिले.

मात्र स्थानिक पोलीस ठाण्याचे मुख्य पोलीस अधिकारी अजय कुमार यांच्या माहितीनुसार, म्हशीला तब्बल 2 दिवस पोलीस ठाण्यातच ठेवण्यात आले होते. यानंतर सूरज यादव यांच्या समर्थकांनी ठाण्यात मोठा गदारोळ केला आणि ती म्हैस सूरज यांचीच असल्याचे पुरावे दिले. या दबावानंतर पोलिसांनी अखेर म्हैस यादव यांच्या हवाली केली.

मगध रेंजचे आयजी विकास वैभव यांनी बीबीसीला फोनवर माहिती देताना स्पष्ट केले की, या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 2 गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी एक गुन्हा ॲट्रॉसिटी कायद्यानुसार नोंदवला गेला आहे. तर दुसरा गुन्हा म्हशीच्या मालकीच्या वादावरून आहे. पाहता पाहता एका म्हशीवरून सुरू झालेला हा वाद स्थानिक पातळीवर चांगलाच राजकीय मुद्दा ठरला आहे.

माजी आमदार अजय यादव यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत, पोलीस सूरज यादव यांच्यावर अन्याय करत असल्याचा थेट आरोप लावला. एका म्हशीच्या वादावरून एखाद्या गरीब माणसाला अशा महागड्या न्यायालयीन कचाट्यात ओढणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तर दुसरीकडे, 'हिंदुस्तानी अवाम मोर्चा'चे राष्ट्रीय प्रवक्ते श्यामसुंदर शरण हे प्रकाश मांझी यांच्या बाजूने मैदानात उतरले. त्यांनी पोलिसांची भेट घेऊन या प्रकरणात निःपक्षपाती तपास झाला पाहिजे, अशी मागणी केली.

डीएनए चाचणी करण्याचा निर्णय

मगध रेंजचे आय.जी. विकास वैभव यांनी बीबीसीला सांगितले की, दोन्ही बाजू आपापल्या दाव्यांवर ठाम असल्याने वैज्ञानिक पुराव्याची मदत घेणे भाग पडले.

पोलिसांनी दोन्ही दावेदारांकडे त्यांच्याकडील म्हशींचे रेकॉर्ड्स मागितले आहेत. या नोंदींमध्ये म्हशीची जात आणि तिच्या वंशावळीबद्दलची माहिती असू शकते.

या संपूर्ण वादाच्या मुळाशी असलेल्या म्हशीचा डीएनए तिच्या पिल्लाशी जुळतात का ते पाहिले जाणार आहे. सूरज यादव यांनी हे पिल्लू आपल्याच घरी असल्याचा दावा केला आहे. या डीएनए तपासणीवरून म्हशीचा खरा मालक कोण हे स्पष्ट होईल.

स्थानिक डीआयजींच्या सांगण्यानुसार, त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांचे एक पथक संबंधित पोलीस ठाण्यात पाठवले. हे पथक प्रत्यक्ष गावात जाऊन लोकांकडे चौकशी करेल आणि आवश्यक पुरावे गोळा करेल.

या वादावर आता डीएनए टेस्ट हाच एकमेव मार्ग उरला असल्याचे सांगत, सूरज यादव यांनी दावा केला आहे की त्यांच्याकडील म्हशीचं पिल्लू ती म्हैस त्यांचीच असल्याचा पुरावा देईल.

ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि युजर्सनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या.

एका युजरने लिहिले, "डीएनएच्या मदतीने म्हशीची मालकी सिद्ध करणारी बिहार पोलीस कदाचित जगातील पहिलीच पोलीस यंत्रणा असेल."

एका युजरने मजेशीर कमेंट करत लिहिले, 'त्या बिचाऱ्या म्हशीला ठाऊकही नसेल की ती सोशल मीडियावर एवढी मोठी 'सेलिब्रिटी' झाली आहे!'

तर अमित यादव नावाच्या युजरने प्रतिक्रिया दिली, ''जिसकी लाठी उसकी भैस' हे आता जुनं झालं. आता 'ज्याचा डीएनए रिपोर्ट, त्याचीच म्हैस' असा नवा काळ सुरू झाला आहे.'

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून डीएनए रिपोर्ट आल्यानंतरच म्हैस तिच्या मूळ मालकाला परत केली जाईल.

म्हशीवरून झालेला हा वाद वरवर पाहता अजब वाटत असला, तरी बिहार पोलिसांनी प्राण्यांच्या अशा मालकी हक्कांचे वाद सोडवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

बिहारमधील पूर्णिया येथे एका व्यक्तीने चक्क एका वळूवरच गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची अजब मागणी पोलिसांकडे केली होती.

तक्रारदाराच्या सांगण्यानुसार, त्या बैलाने आधी त्यांचा पाठलाग केला, नंतर शिंगांनी जोरदार धडक देऊन जमिनीवर आपटले. यामध्ये ते जखमी झाले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही पक्षांना एकत्र बसवून समजूत काढली आणि हे प्रकरण मिटवून तक्रार मागे घेण्यात आली.

विशेष म्हणजे, याच पूर्णियामध्ये पोलिसांनी याआधी 3 बकऱ्यांच्या गूढ मृत्यूचाही तपास केला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)