You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'जर एखाद्या हिंदूला मुस्लिमाने भारतात राहू नये असे वाटत असेल तर तो हिंदूच नाही' - सरसंघचालक भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी मॅडिसन स्क्वेअर गार्डन या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला विरोध प्रदर्शनांचा तसेच धार्मिक स्वातंत्र्यावरील एका अमेरिकी आयोगाच्या विरोधाचाही सामना करावा लागला आहे.
'युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन' (वन वर्ल्ड ह्युमॅनिटी) या कार्यक्रमावेळी विविधेतील एकता जपणे आणि बहुविधतेचा सन्मान करण्याचा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.
या कार्यक्रमाचे आयोजन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग फोरम यांच्यामार्फत करण्यात आले होते.
अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार शनिवारी (29 ऑगस्ट) झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आपली भूमिका मांडली.
'वन वर्ल्ड ह्युमॅनिटी'ने मोहन भागवत यांचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यात मोहन भागवत असं म्हणाले की, जर एखाद्या हिंदूला असं वाटते की भारतात मुस्लिमाने राहू नये तो हिंदू नाहीये.
याआधी, न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी यांनी या कार्यक्रमाबाबत केलेल्या भाष्यामुळे हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला होता.
ममदानी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ही बहुविधतेविरोधात असल्याचे म्हटले होते.
काय म्हणाले मोहन भागवत?
अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करताना सरसंघचालक भागवत यांनी आपल्या भाषणात म्हटले की भारताच्या 'डीएनए'मध्येच 'विविधतेत एकता' सामावली आहे.
भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांनी त्यांच्या कर्मभूमीशी एकनिष्ट राहावे, असे मोहन भागवतांनी म्हटले. याच वेळी आपल्या जन्मभूमीने म्हणजे भारताने दिलेली मूल्ये विसरू नका. भारताचे महत्त्वाचे मूल्य हे 'वननेस' हे आहे असे भागवत यांनी म्हटले.
बहुविधतेचा आदर-सन्मान करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचवेळी आपण एक आहोत ही भावना देखील आपण विसरता कामा नये, असे मोहन भागवत यांनी म्हटले.
हिंदुत्वावर काय म्हणाले?
कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जर एखाद्या हिंदूला असं वाटते की भारतात मुस्लिमाने राहू नये तो हिंदू नाहीये. हा व्हीडिओ वन वर्ल्ड ह्युमॅनिटीने शेअर केला आहे.
मोहन भागवत पुढे म्हणाले, "एखाद्या हिंदूला भारतात एकही मुस्लीम असू नये असे वाटत असेल, तर तो हिंदू राहणार नाही. तुम्हाला स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचे असेल, तर सर्व पंथ एकाच ध्येयाकडे घेऊन जातात आणि प्रत्येक माणूस हा आदरास पात्र आहे मूल्यांवर तुमचा विश्वास हवा. माणसांमध्ये कोणताही भेद नाही."
"भारतात मुस्लीम बांधव देखील आहेत. 2018 मध्ये त्यांनी मला विचारले होते की तुम्ही (RSS) हिंदू संघटना आहात. तुम्ही हिंदू राष्ट्राबद्दल बोलता. आम्हाला बाहेर टाकलं जाईल का? तर त्यावर मी म्हणालो की 'नाही. हे हिंदुत्व नाहीये."
"जर एखादा हिंदू असा विचार करत असेल की भारतात एकही मुस्लीम राहता कामा नये तर तो हिंदूच राहणार नाही. जर तुम्ही हिंदू असाल तर तुमचा यावर विश्वास असायला हवा की सर्व पंथ, सर्व मार्ग हे एकाच ध्येयाकडे नेतात," असं त्यांनी म्हटलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)