आधीच दुष्काळ, त्यात पुढे गेलेल्या परीक्षा; 'या' मुली दुहेरी संकटाचा सामना कशा करत आहेत?

    • Author, प्राची प्रतिभा शिरीष
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

"माझे वडील आठ दिवस झाले कोणाशी बोलत नाहीत. काय होईल काळजी वाटते," प्रतिक्षा (नाव बदललं आहे) सांगत होती. बोलताना तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.

यवतमाळची प्रतिक्षा पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. घरची शेती, पण यंदा सगळंच पीक गेलं. झालेल्या नुकसानाच्या चिंतेत वडील 8 दिवसांपासून बोलत नसल्याने तिची काळजी वाढली आहे.

एकीकडे दुष्काळाचं सावट दुसरीकडे परीक्षेच्या तयारीची चिंता अशा दुहेरी संकटात ती सापडली आहे.

प्रतिक्षाने झुऑलॉजी स्पेशलायजेशन घेत एमएसस्सी केलंय. त्यानंतर ती स्पर्धा परीक्षेकडे वळली. यंदा ती दुसऱ्यांदा परीक्षा देत आहे. गेल्या वेळी काही पॉईंट्सने निवड झाली नाही.

आत्तापर्यंत तिने पार्ट टाईम नोकरी करून आपला खर्च भागवला. मात्र आता परीक्षेला दोन महिने शिल्लक असताना अभ्यासासाठी नोकरी सोडली आणि त्याच वेळी दुष्काळाचं संकट येऊन ठेपलं. त्यामुळे काय करायचं या काळजीने अभ्यासावरही परिणाम होत असल्याचं ती सांगते.

खर्च कमी करायचा म्हणून पहिला परिणाम जेवणावर आणि दुसरा अभ्यासावर झाला आहे. दोनच महीने आहेत तर आपण ताकदीने अभ्यास करावा अशी तिची इच्छा आहे. पण हे 'दोन महिने' तिच्यासाठी सगळ्याच अर्थाने परीक्षा बघणारा काळ झाला आहे.

हीच परिस्थिती अनघा कुलकर्णीचीही. अनघा नांदेडच्या उस्माननगरची. तिची एकल पालक असणारी आई केअरटेकर म्हणून काम करून मुलांचा खर्च करते.

अनघाच्या मामाने तिच्या शिक्षणाचा भार उचलला. पण आता दुष्काळ, नसलेलं पीक आणि वाढणारा खर्च त्यांनाही पेलवत नाही. त्यामुळे आईच्या 12 हजारांच्या मासिक उत्पन्नात अनघा आणि तिच्या भावाचा खर्च पेलवला जात आहे.

अनघा पेईंग गेस्ट म्हणून राहते. तिथे मुलांना बंक बेड मधल्या 2 पैकी 1 बेड आणि कपाट पुरवलं जातं. यातला खालचा बेड असेल तर महिन्याला 4500 रुपये भरावे लागतात. शिवाय लायब्ररीसाठी 1 हजार 500 आणि नोट्स, झेरॉक्स याचा खर्च आहेच. हा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न तिच्या समोर आ वासून उभा आहे.

अनघा सांगते, " महिन्याच्या शेवटी पैसे कुठून आणायचे याचा याचा ताण येतो. शारीरिक ताण असेल तर कसंही करू. पण मानसिक ताण असेल तर अभ्यास कसा करणार?"

23 वर्षांच्या तेजश्री गलांडेचीही हीच स्थिती. तेजश्री सातारा जिल्ह्यातल्या म्हसवडची रहिवासी. एमए पॉलिटिकल सायन्स झाल्यावर तिने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.

तीन भावंडातली तेजश्री मोठी. घरी आई वडील काम करुन मुलांना शिकवतात. महिन्याकाठी सहा ते सात हजारांचा खर्च. ती सांगते, "लोक काय म्हणतील याची चिंता वाटते. मैत्रिणींची लग्न झाली. ज्यांची शिकण्याची इच्छा होती त्यांना यायला मिळालं नाही. आपल्याला काय म्हणतील असं वाटत राहतं".

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. एमपीएससीच्या 2022-23च्या वार्षिक अहवालातली आकडेवारी सांगते की त्या वर्षी 32 परीक्षांद्वारे पदभरती झाली. ज्यासाठी 13,86,762 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 3,865 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात या आधीच्या वर्षी झालेल्या परीक्षा आणि त्याच्या निकालांचाही समावेश आहे.

आधीच दुष्काळ आणि त्यात पुढे गेलेल्या परीक्षा यामुळे हे गणित आणखी बिघडलं आहे. गट 'क'ची परीक्षा यंदा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार होती. पण ती आता 3 जानेवारी 2027 ला होणार आहे. यामुळे राहण्याच्या खर्चात दोन महिन्यांची तरतूद करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. तलाठी, क्लर्क, टॅक्स असिस्टंट अशा विविध पदांसाठी होणाऱ्या या परीक्षेला 5707 जागांसाठी 11 लाख अर्ज आले आहेत.

'दुष्काळामुळे विद्यार्थ्यांना शहरात राहणं अवघड'

दुष्काळामुळे ही विद्यार्थ्यांना शहरात राहणं अवघड होत चालल्याचं स्टूटंड हेल्पिंग हॅण्डचे कुलदीप आंबेकर सांगतात. कुलदीपकडे MPSC करणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे आत्तापर्यंत मदत मागणारे दीड हजारहून अधिक अर्ज आले आहेत.

यात 26 वर्षांखालील वयोगट आणि प्रीलिमला पडलेले मार्क या अटी टाकल्या तरी मेन्स देणाऱ्या तातडीने मदतीची आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी 150 पर्यंत पोहोचत असल्याचं तो सांगतो.

यामागे सामाजिक आणि शैक्षणिक या दोन्ही विषमता कारणीभूत असल्याचं फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रकाश पवार मांडतात. किमान मुख्य परीक्षा देणाऱ्या दुष्काळ ग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शासनाने सहाय्य करायला हवे अशी मागणी ते करतात.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "राज्य सेवेची परीक्षा देणारी बहुतांश मुलं ही ग्रामीण भागातील आहेत. शहरी मध्यमवर्गातल्या या परीक्षा देणार्‍या मुलांचं प्रमाण कमी आहे. सरकारी नोकरीकडे ग्रामीण भागातील हे विद्यार्थी सन्मान आणि प्रतिष्ठा म्हणून बघतात. आपल्या शिक्षण पद्धतीत शिक्षण मिळतं पण स्किल मिळत नाही. त्यामुळे संधी कमी होतात. याचा परिणाम बहुतांश विद्यार्थी या परीक्षांकडे वळण्यातून दिसत आहे."

"पूर्वी स्पर्धा परीक्षांमधून अनेक संधी उपलब्ध होत्या. आता मात्र त्या कमी झाल्या आहेत. पण विद्यार्थी संख्या वाढते आहे. त्यातच पेपर फुटी सारख्या परिस्थिती मुळे असुरक्षितता वाढली आहे. त्यातच शिक्षण संपलं पदवी मिळाली असं गणित यात नाही. परीक्षा दिली तरी निवड झाली असं नाही. त्यांना तयारी करत रहावी लागते."

"महाविद्यालयात कमवा शिका सारख्या योजनांचा आधार असतो इथं तो सुद्धा नाही. त्यामुळे पालकांवरच भिस्त रहाते. यंदा त्यांना फटका बसला आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीचा विचार करून सरकारने दुष्काळग्रस्त भागातील मेन्सपर्यंत गेलेल्या विद्यार्थ्यांना तरी आर्थिक आधार देण्याचा विचार करावा."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)