भारताच्या सर्वात मोठ्या शेअर विक्रीचा फटका स्वस्त मोबाईल इंटरनेटला बसणार?

जिओ प्लॅटफॉर्म्सच्या संचालक ईशा अंबानी (डावीकडे) आणि जिओ प्लॅटफॉर्म्सचे व्यवस्थापकीय संचालक आकाश अंबानी पत्रकार परिषदेदरम्यान.
फोटो कॅप्शन, जिओ प्लॅटफॉर्म्सच्या संचालक ईशा अंबानी (डावीकडे) आणि जिओ प्लॅटफॉर्म्सचे व्यवस्थापकीय संचालक आकाश अंबानी पत्रकार परिषदेदरम्यान.
    • Author, निखिल इनामदार
    • Reporting from, मुंबई
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

मेटा आणि गुगल यांची गुंतवणूक असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्स या भारतातील सर्वात मोठ्या दूरसंचार कंपनीचे शेअर्स बुधवारी (28 ऑक्टोबर) शेअर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

भारतीय शेअर बाजार सध्या कठीण काळातून जात असतानाही, जिओ प्लॅटफॉर्म्सच्या ऐतिहासिक आयपीओला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे 3.2 अब्ज डॉलरचा (सुमारे 30 हजार 400 कोटी रुपये) हा आयपीओ भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरला आहे.

जगभरातील मोठे गुंतवणूकदार, देशातील वित्तीय संस्था आणि सामान्य गुंतवणूकदारांनीही या आयपीओमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीसाठी अर्ज केले आहेत.

21 ऑक्टोबर रोजी आयपीओसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाल्यानंतर काही तासांतच, उपलब्ध शेअर्सपेक्षा जास्त मागणी अर्ज आले.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मालकीची 'जिओ' ही भारतातील अत्यंत महत्त्वाची कंपनी आहे. सुमारे 50 कोटी लोक जिओच्या स्वस्त मोबाईल इंटरनेट सेवेचा वापर करतात. परंतु, जिओचा झपाट्याने झालेला विस्तार अनेक वादांमुळेही चर्चेत राहिला आहे.

2016 मध्ये जिओने भारतातील आधीच प्रचंड स्पर्धा असलेल्या दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला. त्यावेळी कंपनीने अतिशय कमी दरात मोबाईल सेवा दिल्या. त्यामुळे लाखो भारतीयांना इंटरनेट वापरण्याची सवय लागली.

परंतु, जिओच्या प्रवेशामुळे दूरसंचार क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली. एकेकाळी या क्षेत्रात 17 कंपन्या होत्या. त्यांची संख्या कमी होऊन आता केवळ तीन प्रमुख कंपन्या उरल्या आहेत.

जिओकडे मोठ्या प्रमाणात पैसा असल्याने कंपनीने अतिशय कमी दरात (प्राइस वॉर) सेवा देऊन स्पर्धा सुरू केली आणि त्यामुळे इतर कंपन्यांना व्यवसाय बंद करावा लागला, असा आरोप टीकाकार करतात.

अलीकडेच, इलॉन मस्क यांनी मुकेश अंबानींवर टीका केली होती. अंबानी हेच 'भारताचे खरे बॉस' आहेत, असं त्यांनी म्हटलं होतं. जिओ भारतात स्टारलिंकची सेवा सुरू होण्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांचा आरोप होता. पण, रिलायन्सने हे आरोप फेटाळून लावल होते. तसेच, मस्क यांच्या कंपनीकडून मिळणाऱ्या स्पर्धेचं स्वागत असल्याचेही रिलायन्सने स्पष्ट केलं होतं.

गेल्या दशकात जिओला अनेक आरोप आणि टीकेला सामोरं जावं लागलं. परंतु, जिओच्या स्वस्त इंटरनेट सेवेमुळे भारतातील डिजिटल क्रांतीला मोठी चालना मिळाली. त्यामुळे डिजिटल अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर विस्तारली. तसेच, ऑनलाइन पैसे देणे, फूड डिलिव्हरी आणि ई-कॉमर्स या गोष्टी सर्वसामान्य लोकांनाही सहज शक्य झाल्या. भारत ही आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

जिओ सुरू झाल्यानंतर अवघ्या 3 वर्षांत ग्राहकांचा इंटरनेट वापर 50 पटींनी वाढला आणि इंटरनेटच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली.

10 वर्षांपूर्वी जिओने स्वस्त. दरात इंटरनेट सेवा सुरू केली. त्यामुळे भारतातील सर्वसामान्यांपर्यंत इंटरनेट पोहोचलं
फोटो कॅप्शन, 10 वर्षांपूर्वी जिओने स्वस्त. दरात इंटरनेट सेवा सुरू केली. त्यामुळे भारतातील सर्वसामान्यांपर्यंत इंटरनेट पोहोचलं
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

स्वस्त दरात सेवा देण्याच्या आक्रमक धोरणामुळे जिओने 2026 पर्यंत सुमारे 55.3 कोटी मोबाईल ग्राहक जोडले. यामुळे इतर क्षेत्रांतही कंपनीचं वर्चस्व वाढलं. वायरलेस ब्रॉडबँड इंटरनेटच्या बाजारपेठेतील 50 टक्के, तर केबल किंवा फायबरद्वारे दिल्या जाणाऱ्या ब्रॉडबँड सेवेच्या बाजारपेठेतील 40 टक्क्यांहून अधिक हिस्सा जिओकडे आहे.

ब्रोकरेज कंपनी एमके ग्लोबलच्या मते, भारतातील मोबाईल इंटरनेटच्या एकूण वापरापैकी 60 टक्के वापर जिओच्या नेटवर्कवर होतो. तसेच, चीन वगळता जगातील सर्वाधिक 5जी ग्राहक जिओकडे आहेत. त्यामुळे या कंपनीला 'भारताचं डिजिटल इंजिन' असंही म्हटलं जातं.

परंतु, जिओ शेअर बाजारात लिस्टेड झाल्यामुळे कंपनीच्या दरविषयक धोरणात मोठा बदल होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. शेअर बाजारात येताना कंपनीचे प्रमोटर आपली हिस्सेदारी सुमारे 3 टक्क्यांनी कमी करणार आहेत. या प्रक्रियेमुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अत्यंत स्वस्त मोबाईल इंटरनेट सेवांचा काळ संपण्याची शक्यता आहे, असंही तज्ज्ञांना वाटतं.

"बाजारपेठेतील आपला हिस्सा वाढवण्यासाठी स्वस्त दरांचा वापर करण्याचा जिओचा काळ आता संपत आला आहे," असं कामायाक्या वेल्थ मॅनेजमेंटचे सहसंस्थापक नित्या शहा यांनी सांगितलं.

"शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्टेड) झाल्यानंतर जिओला छोट्या भागधारकांनाही उत्तर द्यावं लागेल. त्यामुळे इंटरनेटचे दर कमी ठेवण्याची कंपनीची इच्छा किंवा उत्साह कमी होऊ शकतो."

ब्रोकरेज कंपनी मोतीलाल ओसवालने एका अहवालात म्हटलं आहे की, भविष्यामध्ये जिओची वाढ केवळ स्वस्त प्लॅन देऊन ग्राहकांची संख्या वाढवण्यावर अवलंबून राहणार नाही. त्याऐवजी, 'प्रत्येक ग्राहकाकडून अधिक कमाई करण्यावर कंपनीचा भर असेल.'

"यासाठी ग्राहकांना 5G सेवेकडे वळवणं, मोबाईल रिचार्जचे दर वेळोवेळी वाढवणं आणि जिथे फायबर इंटरनेट पोहोचलेलं नाही, अशा घरांपर्यंत वायरलेस ब्रॉडबँड सेवा पोहोचवणं यावर जिओ लक्ष केंद्रित करेल."

जिओ शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यामुळे इतर दूरसंचार कंपन्यांनाही मोबाईल सेवांचे दर वाढवण्याची संधी मिळू शकते. कारण, जिओ कमी दरात सेवा देऊन आपल्यापेक्षा स्वस्त ठरेल आणि ग्राहक खेचून नेईल, ही भीती आता कमी होऊ शकते.

"या बदलाचा सर्वाधिक फायदा व्होडाफोन-आयडियाला होऊ शकतो," असं नित्या शहा म्हणाले. ते पुढे म्हणाले, "आर्थिक स्थिती सर्वांत कमकुवत असलेल्या या कंपनीला आता दूरसंचार क्षेत्रातील बदलांचा मोठा फायदा मिळू शकतो."

काही वर्षांपूर्वीच टेलिकॉम क्षेत्रातील सर्व कंपन्यांनी मोबाईल सेवांचे दर वाढवले होते. आता पुन्हा दर वाढल्यास त्याचा फटका भारतीय ग्राहकांना बसू शकतो. तज्ज्ञांच्या मते, दरवाढ झाल्यास ग्राहक पुन्हा एकदा आपली कंपनी बदलू शकतात. विशेषतः कमी खर्चात मोबाईल सेवा वापरू इच्छिणारे ग्राहक ज्या कंपनीचे प्लॅन सर्वांत स्वस्त असतील, त्या कंपनीकडे वळू शकतात.

मोबाईल सेवांचे बिल वाढण्याची शक्यता असताना, जिओचा आयपीओ गुंतवणूकदारांना भारतातील इंटरनेटच्या वाढत्या वापरातून कमाई करण्याची संधी देतो. मनोरंजन, क्लाउड कॉम्प्युटिंग, गेमिंग आणि आर्थिक सेवांसारख्या क्षेत्रांतही जिओ आपल्या डिजिटल सेवांचा विस्तार करत आहे. त्यामुळे या सेवांच्या वाढत्या वापरातून कंपनीला भविष्यात जास्तीची कमाई होऊ शकते, अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे.

इंटरनेटचे कमी दर आणि स्मार्टफोनचा वाढता वापर यामुळे भारत मोबाईल इंटरनेट वापरणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे.

जिओच्या प्रत्येक ग्राहकाचा महिन्याला इंटरनेट वापर 2024 मध्ये 28.7 जीबी होता. तो 2026 मध्ये वाढून 42.3 जीबी झाला आहे. म्हणजेच, दोन वर्षांत इंटरनेट वापरात तब्बल 52 टक्क्यांची वाढ झाली आहे.

काही अंदाजांनुसार, लोकांच्या हातात खर्चासाठी अधिक पैसे येऊ लागल्याने (डिस्पोजेबल इन्कम) 2030 पर्यंत प्रत्येक ग्राहकाचा मासिक इंटरनेट वापर 65 जीबीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

या सर्व गोष्टींमुळे जिओला प्रत्येक ग्राहकाकडून होणारी सरासरी कमाई दीर्घकाळात वाढवण्यास चांगली मदत मिळेल.

एमके ग्लोबलच्या मते, "भारतात डिजिटल सेवांचा वापर अजूनही चीन आणि अमेरिकेच्या तुलनेने खूप कमी आहे. त्यामुळे भारतात या सेवांचा वापर वाढण्याची आणि त्यातून व्यवसायाची मोठी संधी निर्माण होण्याची शक्यता आहे."

मूडीज या पतमानांकन संस्थेच्या मते, शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यामुळे जिओच्या कामकाजामध्ये अधिक पारदर्शकता येईल. तसेच, कंपनीची 'बाजारपेठेतील किंमत किती' आहे, याचा गुंतवणूकदारांना अधिक स्पष्ट अंदाज येईल. सध्या जिओ हा रिलायन्स इंडस्ट्रीजचा भाग आहे. रिलायन्सचा तेल शुद्धीकरणापासून ते किरकोळ विक्रीपर्यंत अनेक व्यवसायांमध्ये सहभाग आहे.

3.2 अब्ज डॉलरचा जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा शेअर विक्रीचा व्यवहार आहे.
फोटो कॅप्शन, 3.2 अब्ज डॉलरचा जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा शेअर विक्रीचा व्यवहार आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेत जिओची महत्त्वाची भूमिका आणि वाढता व्यवसाय यामुळे गुंतवणूकदार उत्सुक आहेत. परंतु, या आयपीओची आणखी एक खास गोष्ट म्हणजे रिलायन्स समूहाकडून 20 वर्षांहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच शेअर विक्री होत आहे.

1958 मध्ये मसाले आणि पॉलिस्टर धाग्यांच्या छोट्या व्यापारातून रिलायन्सची सुरुवात झाली. त्यानंतर कंपनीने कापड, पेट्रोकेमिकल्स, तेल शुद्धीकरण, किरकोळ विक्री, दूरसंचार आणि डिजिटल सेवांसारख्या क्षेत्रांत विस्तार केला.

दीर्घकाळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देणारी कंपनी म्हणून रिलायन्सला ओळखलं जातं. त्यामुळे सर्वसामान्य छोटे गुंतवणूकदारही या कंपनीला विशेष महत्त्व देतात.

रिलायन्स साम्राज्याचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांनी 1980 आणि 1990 च्या दशकात सर्वसामान्य लोकांमध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीची आवड निर्माण करण्यात महत्त्वाची आणि मोठी भूमिका बजावली, असं मानलं जातं. त्यांच्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूक केवळ व्यापारी आणि श्रीमंत कुटुंबांपुरती मर्यादित न राहता ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली.

सुरुवातीच्या काळात रिलायन्सने आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभांना मोठ्या कार्यक्रमांचं स्वरूप दिलं. या सभांमध्ये कंपनीच्या मोठ्या घोषणा केल्या जात, लाभांश दिला जात आणि सर्वसामान्य लोकांनी कंपनीचे शेअर्स घेतल्याचा आनंद साजरा केला जात असे.

यामुळे रिलायन्सचे अनेक छोटे गुंतवणूकदार तयार झाले. कालांतराने या गुंतवणूकदारांचा कंपनीवरचा विश्वास अधिक दृढ झाला. त्यातील अनेकांचं रिलायन्सशी भावनिक नातंही निर्माण झालं.

मागील वर्षभरात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सुमारे 20 टक्क्यांची घसरण झाली आहे. परंतु, दीर्घकाळातील कंपनीची कामगिरी पाहता गुंतवणूकदारांचा तिच्यावरचा विश्वास अजूनही कायम आहे.

मुंबईतील वेल्थमिल्स सिक्युरिटीजचे क्रांती बथिनी यांनी बीबीसीला सांगितलं, "गेल्या 30 वर्षांत या कंपनीने दरवर्षी सरासरी सुमारे 30 टक्के परतावा दिलेला आहे."

"त्यामुळे जिओच्या आयपीओमधूनही पुन्हा अशीच कमाई होईल, अशी गुंतवणूकदारांना आशा आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)