You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नेपाळ पूर : या घराच्या बाल्कनीत अडकलेल्या लोकांचं पुढे काय झालं?
नेपाळमधील भीषण पुराची आता भयावह दृश्यं आणि व्हीडिओ समोर येत आहेत.
सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटो आणि व्हीडिओंवरून नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या पुराचा लोकांवर किती भीषण परिणाम झाला आहे, हे दिसून येतंय.
या व्हीडिओंमध्ये पुराचं पाणी आणि मातीचा ढिगारा एकापाठोपाठ एक परिसर उद्ध्वस्त करताना दिसत आहे. पक्की घरंदेखील पुराचं पाणी एखाद्या काडीसारखी वाहून नेत असल्याचं दिसत आहे.
मात्र, या भयावह व्हीडिओंमध्ये एक व्हीडिओ मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतंय.
त्रिशूली नदीलगतच्या परिसरातील व्हीडिओ - बीबीसी व्हेरिफाय
बीबीसी व्हेरिफायच्या माहितीनुसार, हा व्हीडिओ त्रिशूली नदीलगतच्या परिसरातील आहे.
बीबीसी व्हेरिफायने या घराचा व्हीडिओ शेअर करताना लिहिलंय की, त्यावेळी काही लोक या घरात अडकले होते.
बीबीसी व्हेरिफायने या लोकांची ओळख जाहीर केलेली नाही. मात्र, व्हीडिओ शेअर करताना त्यांनी सांगितलं आहे की, या काळात हे कुटुंब कसंबसं बचावलं. दरम्यान, घराच्या छतावरून कोणीतरी मदतीसाठी लाल रंगाचा दुपट्टा फडकवत होतं.
पूर ओसरल्यानंतर लोक मदतीसाठी तिथे पोहोचले.
व्हीडिओमध्ये किमान तीन लोक दिसत आहेत. त्यात एक पुरुष, एक महिला आणि एक मूल, जे बहुधा लहान मुलगी आहे.
हे लोक घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीसारख्या जागेत अडकलेले दिसत आहेत. त्यांच्या चारही बाजूंनी चिखलाचा महापूर वाहत आहे. त्यासोबत मोठमोठे दगड, चिखलाचा ढिगारा आणि घराच्या छताचे पत्रेही वाहून येत आहेत.
या वस्तू सातत्याने त्या घरावर आदळत आहेत. तरीही घर उभं आहे.
दरम्यान, घरातील लोक असहायपणे बाल्कनीत उभे असल्याचं दिसत आहे. एक महिला घराच्या छतावर जाऊन मदतीसाठी लाल दुपट्टा फडकवत असल्याचं दिसत आहे.
सोशल मीडियावर लोक या व्हीडिओवर प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मीडियावर लोक काय म्हणत आहेत?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक एरिक चेन यांनी या व्हीडिओचं फुटेज शेअर करताना लिहिलंय की, "अलीकडे पाहिलेल्या सर्वात अस्वस्थ करणाऱ्या दृश्यांपैकी हे एक आहे. आजूबाजूचं सगळं उद्ध्वस्त करणाऱ्या वेगवान प्रवाहाच्या मध्यभागी एक घर अजूनही उभं आहे."
"लोक बाल्कनी आणि छतावर कसंबसं तग धरून आहेत, तर चिखल, बर्फ, खडक आणि पाण्याची मोठी लाट नेपाळ-तिबेटच्या या दरीला चिरत पुढे जात आहे. हे केवळ आकडे नाहीत. हे एक कुटुंब आहे, जे पाण्याची पुढची लाट त्यांच्याकडे उरलेली शेवटची सुरक्षित जागाही वाहून नेणार आहे की नाही, याची वाट पाहत आहे. ते जिवंत राहावेत, अशी प्रार्थना आहे. पाण्याची आणखी एक लाट येण्यापूर्वी बचाव पथक त्यांच्यापर्यंत पोहोचावं, अशी प्रार्थना आहे."
"या फुटेजला असह्य बनवणारी गोष्ट केवळ निसर्गाची ताकद नाही. नेपाळच्या बाजूने आलेल्या वृत्तांनुसार, पुराचा हा वेगवान प्रवाह तिबेटच्या बाजूने ल्हेन्दे-भोटेकोशी नदीपासून सुरू झाला, जिथे हिमनदीचा काही भाग तुटल्यानंतर मलबा नदीत जाऊन पडला. खालच्या भागात राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की, त्यांना चिनी अधिकाऱ्यांकडून वेळेवर कोणतीही अधिकृत पूर्वसूचना मिळाली नाही.
बीजिंगकडून सूचना येण्याआधीच स्थानिक लोकांनी धोक्याची माहिती दिली. त्रिशूली नदीची पाणीपातळी जवळपास 30 मिनिटांत 9 मीटरपर्यंत वाढली. सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी मिळालेल्या वेळेचा आणि बाल्कनीत अडकून जग आपल्या डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना पाहण्याचा हा अर्धा तासच फरक आहे."
"चीनने नंतर वेळेवर इशारा देण्यात कोणतीही कुचराई झाल्याच्या वृत्ताला नाकारत म्हटलं की, बर्फ आणि खडकांचा हा हिमस्खलन इतका अचानक झाला की नदीतील गेजलाही तो फारसा टिपता आला नाही. मग 2025 मध्ये याच नदीत आलेल्या पुरानंतर ज्या सीमापार पूर्वसूचना यंत्रणेवर चर्चा झाली होती, ती यावेळी पूर येईपर्यंत कराराच्या स्वरूपात लागू का होऊ शकली नाही, याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. वरच्या भागातून येणारी शांतता ही केवळ तांत्रिक बाब नाही. ज्यांच्याकडे वाचण्यासाठी कुठेही जाण्याची वेळ नव्हती, त्यांच्याकडून हिरावून घेतलेली ही काही मिनिटं आहेत."
"शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. एक हजाराहून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. त्यात परदेशी यात्रेकरू आणि ट्रेकर्सचाही समावेश आहे. घर कोसळण्यापासून वाचलं, ही काही चमत्काराची कहाणी नाही. हे जीवन आणि नदीच्या दरम्यान उरलेलं अत्यंत नाजूक शेवटचं अंतर आहे. हे कुटुंब अजूनही त्याच ठिकाणी सुरक्षित असावं, अशी प्रार्थना आहे."
नेपाळच्या पुरात मृतांचा आकडा 600 पार
नेपाळच्या पुरात आतापर्यंत 734 मृतदेह सापडले असून सुमारे 2,500 लोक बेपत्ता आहेत. या आपत्तीमधून आतापर्यंत जवळपास 4,500 लोकांना वाचवण्यात आलं आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील 404 नागरिक सुरक्षित असून 338 नागरिकांशी संपर्क झाला आहे.
नेपाळमध्ये पुरानंतर आंतरराष्ट्रीय मदत संस्थांनी आणि अनेक देशांच्या सरकारांनी आपत्कालीन मदत आणि बचावकार्याला वेग दिला आहे.
युरोपीय संघ, कॅनडा आणि अमेरिका यांच्यासह अनेक देशांनी नेपाळला मदत सामग्री किंवा आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)