You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नेपाळ: पुराबाबतच्या वेगवेगळ्या बातम्यांमागे ही आहेत कारणं, महाराष्ट्रातील एवढे पर्यटक आतापर्यंत आले परत
- Author, बिनिता दाहाल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी भागात अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक अद्यापही बेपत्ता आहेत.
नेपाळच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 734 मृतदेह सापडले असून सुमारे 2,500 लोक बेपत्ता आहेत. या आपत्तीमधून आतापर्यंत जवळपास 4,500 लोकांना वाचवण्यात आलं आहे.
आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील 404 नागरिक सुरक्षित असून 338 नागरिकांशी संपर्क झाला आहे.
महाराष्ट्रातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात
महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सागामधून 41 जण आज परतले असून 106 जण नागपूरला उद्या पहाटे साडेचार वाजता पोहोचतील.
जवळपास 143 नागरिक राज्यात यशस्वी व सुरक्षितरित्या परतण्याच्या मार्गावर असून नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात आले आहेत.
मंत्रालयातील नियंत्रण कक्षात 24 तास हा कक्ष कार्यरत असून महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सहाय्यता व मदतकार्य समन्वय साधला जात आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.
महापुराच्या घटनेच्या कालावधीत चितवनमध्ये अडकलेल्या राज्यातील 45 जणांच्या पर्यटकांच्या ग्रुपने आज भारतीय हद्दीत प्रवेश केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमधील ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नाशिक, पुणे, मुंबई व अहिल्यानगरमधील नागरिक नेपाळला गेले होते.
नागपूर येथील 106 जणांचा प्रवास शनिवारी बिहार मार्गे नागपूरच्या दिशेने झाला.
परराष्ट्र मंत्रालयाकडून 28 ऑगस्ट रोजी अखेरपर्यंत चीन मधून नेपाळमध्ये सुरक्षितरित्या प्रवेश केलेल्या 149 भारतीय पर्यटक नागरिकांची यादी राज्यांना पाठवण्यात आली आहे.
बोरीवली आणि अंधेरी येथील 8 पर्यटकांची माहिती देण्यात आली असून आपत्तीमुळे ते नेपाळमध्ये अडकले आहेत. यापैकी अंधेरी येथील लक्ष्मीनारायण आचार्य यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
परंतु, त्यांचा अथवा ग्रुप मधील इतराचा मोबाईलद्वारे संपर्क होत नसल्याने सद्यस्थितीत अडचणी येत आहेत. त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मुंबईतील या पर्यटकांच्या नातेवाईकांच्या संपर्कात प्रशासन आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
गोरेगाव येथील 58 वर्षीय वीणा कुलकर्णी या देखील नेपाळ पुरात बेपत्ता आहेत. त्या 23 ऑगस्टला सकाळी 11 वाजता मुंबईहून काठमांडूला रवाना झाल्या होत्या.
वीणा यांच्यासोबत iFlex Solutions मधील त्यांचे माजी सहकारी आणि त्यांच्या पत्नींसह 10 ते 12 जणांचा ग्रुप होता. हा संपूर्ण ट्रेकिंग ग्रुप बेपत्ता असल्याची माहिती आहे.
पुन्हा पूर येण्याची शक्यता कितपत आहे?
एकीकडे मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असताना, आता धोका खरंच पूर्णपणे टळला आहे का? हा प्रश्न निर्माण झालेला आहे.
हवामान विभागानं सध्या मुसळधार पावसाची शक्यता नाकारली आहे. परंतु, उंच पर्वतीय भागात तयार झालेल्या दोन अस्थिर सरोवरांमुळे आणखी एका पुराचा धोका पूर्णपणे टळलेला नाही.
हायड्रॉलॉजी आणि हवामान विभागानं म्हटलं आहे की, थोडा पाऊस झाला असला तरी मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता नाही.
ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ विभूती पोखरेल म्हणतात की, "हलका पाऊस पडेल असं दिसतं पण मुसळधार पावसाची शक्यता नाही."
मात्र, विभागाचे वरिष्ठ हायड्रॉलॉजिस्ट बिनोद पराजुली यांनी सांगितलं की, अद्यापही पुराचा धोका कायम आहे, कारण बुधवारी ज्या ठिकाणी हिमस्खलन झालं होतं, त्या जागेच्या खाली दोन तलाव तयार झाले आहेत.
"पर्वतांमध्ये हिमस्खलनाच्या जागेच्या अगदी खाली आणि भूस्खलनाच्या जागेच्या वर एक तलाव दिसत आहे. त्याचप्रमाणे, भूस्खलनामुळे नदीचा प्रवाह अडवल्याने आणखी एक तलाव तयार झाला आहे," असंही पराजुली म्हणाले.
ही दोन्ही सरोवरं अत्यंत अस्थिर आहेत. कारण, ज्या भागात ती तयार झाली आहेत तो भाग भूस्खलनास अनुकूल आहेत. जसजसे ती पाण्यानं भरू लागतील, तसतसे ती फुटण्याचा धोका कायम राहील.
त्यांनी सांगितलं की, सुमारे 4 हजार आणि 3 हजार मीटर उंचीवर असलेली ही सरोवरं कदाचित फुटणार नाहीत. परंतु, खालच्या काठावरील वस्त्यांना सततच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
हायड्रॉलॉजिस्ट पराजुली म्हणाले की, सुरुवातीला हिमस्खलन तिबेटच्या दिशेनं झालं असावं, असं वाटत असलं तरी, तपासादरम्यान विभागाला हे स्पष्ट झालं की हिमस्खलन प्रत्यक्षात नेपाळच्या दिशेनं झालं होतं.
पुढे ते म्हणाले की, "सॅटेलाइट इमेजेस पाहता, पूर तिबेटमधून आल्याचं दिसत नाही. पूर नेपाळ आणि चीनच्या सीमेजवळून आल्याचं दिसतं."
हे हिमस्खलन नेपाळमधील लांगटांग लिरुंग हिमालच्या पश्चिम भागातून सुरू झालं असावं असं दिसतं. त्यामुळे, हिमस्खलनाचे ठिकाण नेपाळी हद्दीत आहे, तर ज्या भागात ही घटना घडली तो भाग नेपाळ आणि तिबेट या दोन्ही देशांच्या सीमेवर आहे.
पुराबाबतचा सुरुवातीचा अंदाज
अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, उंच पर्वतीय भागातील परिस्थिती समजणं कठीण असल्यामुळे सुरुवातीच्या दिवसांत त्याबाबत अनेक तर्क लावण्यात आले आणि चुकीची माहितीही पसरली.
त्यांनी सांगितलं की, सॅटेलाइट इमेजेसमधून मिळालेली अपूर्ण माहिती आणि हेलिकॉप्टर त्या भागात पोहोचू न शकल्यामुळे, सुरुवातीला पुराच्या कारणाबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते.
रसुवा येथील भोटेकोशीमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी झाली. सुरुवातीला, जल आणि हवामान विभागासह सरकारी यंत्रणांना पुराच्या नेमक्या कारणाबद्दल खात्री नव्हती. त्यामुळे भूकंप आणि हिमनदी फुटण्यासह विविध प्रकारचे तर्कवितर्क लावले गेले.
हायड्रॉलॉजी आणि हवामानशास्त्र विभागानं सांगितलं होतं की, पुराच्या दुसऱ्याच दिवशी भोटेकोशीमध्ये हिमस्खलन झाल्यानं मोठ्या प्रमाणात पूर आला होता.
मात्र, यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनं (USGS) अहवाल दिला आहे की त्या परिसरात भूकंपाच्या हालचालींची चिन्हं देखील आढळली आहेत.
पुराविषयी वेगवेगळी माहिती का आली?
राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानं म्हटलं आहे की, उंच हिमालयीन प्रदेशात घडलेल्या या घटनेचं कारण निश्चित करणं कठीण आहे. त्यामुळे, त्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले.
प्राधिकरणाचे प्रमुख धर्मराज उप्रेती म्हणाले की, "उंच हिमालयीन प्रदेशात नेमकं काय घडलं हे आम्हाला माहीत नव्हतं. त्यामुळे लोक आपापले अंदाज बांधत होते. काहींच्या मते ते हिमस्खलन होतं, तर काहींनी हिमनदीतील सरोवर फुटल्यामुळे असं घडलं, असं म्हटलं. आमच्याकडे वैज्ञानिक माहितीचा अभाव असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली."
त्यामुळे, आपल्याला या संपूर्ण विषयाची गुंतागुंत समजून घेऊन एक पूर्वसूचना देणारी सिस्टीम विकसित करणं आवश्यक आहे. यासाठी प्रचंड गुंतवणुकीची गरज लागेल, असंही ते म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)