You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सप्टेंबरमध्ये पाऊस कमी, तापमान अधिक; काय आहे हवामान अंदाज, महाराष्ट्रात कशी असेल स्थिती?
महाराष्ट्रासह देशभरात बहुतांश ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये नेहमीच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या महिनाभरात देशाच्या बहुतांश भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे.
31 ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय हवामान खात्याने सप्टेंबर महिन्यासाठी हवामान अंदाज वर्तवला.
IMDच्या अंदाजानुसार, सप्टेंबरमध्ये देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या 91 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर महिन्यात देशातील पावसाची दीर्घकालीन सरासरी 167.9 मिलिमीटर आहे.
मात्र, देशातील सर्वच भागांत पाऊस कमी राहील असं नाही.
वायव्य, ईशान्य, पूर्व, पूर्व-मध्य आणि आग्नेय भारताच्या काही भागांत सामान्य किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पावसाची कशी असेल स्थिती
सप्टेंबरच्या सुरुवातीसाठी जारी करण्यात आलेल्या प्रादेशिक अंदाजानुसार महाराष्ट्रात या महिन्यात पाऊस पडेल, मात्र त्याचं प्रमाण नेहमीपेक्षा कमी राहू शकतं.
पुढील चार आठवड्यांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल.
विदर्भात मात्र उत्तरेकडील भागात सरासरीएवढा किंवा सरासरीपेक्षा थोडा जास्त पाऊस पडू शकतो. विदर्भाच्या इतर भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे
विदर्भात प्रामुख्यानं सप्टेंबरच्या सुरुवातीला पावसाची शक्यता आहे, तसंच काही दिवस मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो.
या मासिक अंदाजातून जिल्हानिहाय आणि दिवसानुसार निष्कर्ष काढता येत नाही. पण एकूण दिसणारं चित्र शेतीसाठी चिंताजनक ठरू शकतं.
तापमानाचा काय अंदाज?
पाऊस कमी पडल्यामुळे उष्णतेत वाढ होण्याची चिंता व्यक्त केली जाते आहे.
IMDच्या अंदाजानुसार, सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
किमान तापमानही बहुतांश भागात सामान्यापेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे.
वायव्य, पश्चिम-मध्य आणि ईशान्य भारतातील काही भाग मात्र याला अपवाद ठरू शकतात.
एल निनोची स्थिती काय?
IMDच्या मते, विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या तीव्र एल निनो परिस्थिती आहे.
आगामी काही महिन्यांत एल निनो आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
हिंदी महासागरातील इंडियन ओशन डायपोल (IOD) सध्या तटस्थ आहे. सप्टेंबरमध्येही ही स्थिती कायम राहण्याची शक्यता IMDच्या मॉडेलने व्यक्त केली आहे.
मात्र, काही आंतरराष्ट्रीय हवामान केंद्रांच्या अंदाजानुसार IOD सप्टेंबरपासून सकारात्मक स्थितीकडे वळू शकतो.
पाऊस कमी आणि तापमान अधिक असल्याचा अंदाज
सप्टेंबर हा नैऋत्य मोसमी पावसाचा शेवटचा महिना आहे. त्यामुळे या महिन्यात पावसाचे प्रमाण शेती आणि जलसाठ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.
सरासरीपेक्षा कमी पावसाचा परिणाम शेती, पाणी उपलब्धता, जलविद्युत निर्मिती आणि पर्यावरणावर होऊ शकतो.
सप्टेंबरमध्ये काही भागांत उष्णतेचा ताण वाढण्याची शक्यताही IMDने व्यक्त केली आहे.
थोडक्यात, सप्टेंबरमध्ये देशासाठी चित्र मिश्र आहे. एकीकडे पावसाची सरासरी कमी राहण्याची शक्यता, तर दुसरीकडे तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रासाठी मात्र महिन्याच्या सुरुवातीला पावसाची शक्यता कायम असल्याचं प्रादेशिक अंदाजातून दिसतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)