नेपाळ पूर : मृतांचा आकडा 489; आतापर्यंत काय काय माहिती आली समोर?

Published
वाचन वेळ: 8 मिनिटे

नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 489 वर पोहोचला आहे.

चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, तिबेटमध्ये पुरामुळे अडकलेल्या 555 पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे.

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी सांगितलं आहे की, बचाव पथकांनी आतापर्यंत जवळपास 600 जणांची सुखरूप सुटका केली आहे.

नेपाळ पर्यटन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, पुरानंतर 31 देशांतील 540 परदेशी नागरिक बेपत्ता आहेत.

या भागात पर्यटक म्हणून येणाऱ्या परदेशी नागरिकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. बेपत्ता भारतीय नागरिकांची संख्या 178 असल्याचं सांगण्यात आलं आहे.

बीबीसी नेपाळीच्या माहितीनुसार, बेपत्ता नागरिकांमध्ये भारतानंतर सर्वाधिक संख्या अमेरिका (65), युक्रेन (53), मलेशिया (51), ऑस्ट्रेलिया (35) आणि ब्रिटनमधील (33) नागरिकांची आहे.

दरम्यान, नेपाळच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नागरिकांना आवाहन केलं आहे की, देशातील पूरग्रस्त भागांशी संबंधित संवेदनशील छायाचित्रं, व्हीडिओ किंवा ऑडिओ प्रसिद्ध करू नयेत.

तसंच, कोणतीही अर्धवट माहिती प्रसिद्ध किंवा शेअर करू नये, असंही आवाहन करण्यात आलं आहे.

नेपाळच्या नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटीने (एनडीआरआरएमए) दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक मृतदेह चितवनमध्ये सापडले आहेत.

नेपाळमधील पुरामुळे बिहारमधील अनेक जिल्ह्यांना 'हाय अलर्ट'वर ठेवण्यात आले आहे. नेपाळमधील अनेक भागांची सीमा बिहारला लागून आहे.

नेपाळच्या 'नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटी'ने म्हटले आहे की, रसुवामधील भोटे कोशी नदीला आलेला पूर हा तिबेटमधील 'हिमनदीच्या भूस्खलना'मुळे (glacial landslide) आला आहे.

नदी अडवल्यामुळे झालेला तलाव फुटण्याची भीती

चीन-नेपाळ सीमेवरील भूस्खलनानंतर मदतकार्य सुरू आहे. मात्र, हे काम सुरू असतानाच नव्या संकटाची शक्यता निर्माण झाली आहे. इथल्या घटनास्थळी पाण्याची पातळी वाढून एक तलाव तयार झाला असून तो फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तिबेटमधील ग्यिरोंगजवळ चीनच्या शोध आणि मदतकार्य पथकांनी दिवसभर पूरस्थितीच्या स्थितीचं आणि संभाव्य धोक्याचं मूल्यांकन केलं. नेपाळमधील चोचेन नदी आणि पुरुचांगपो झांग्बो नदी यांच्या संगमाजवळ हा तलाव तयार झाला आहे.

चीनच्या सरकारी माध्यमांनुसार, मदतकार्य पथकांनी सांगितलंय, मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी या जलसाठ्याला स्थिर ठेवणं हे प्राधान्याचे काम आहे.

चीनच्या जलसंपदा मंत्रालयाने विविध मॉडेलिंग तंत्रांचा वापर करून तलावातील पाण्याचे प्रमाण मोजलंय. या मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पाऊस सुरू राहिल्यास पुढील तीन दिवसांत हा तलाव फुटण्याचा मोठा धोका आहे.

मंत्रालयानं संभाव्य धरणफुटीसदृश परिस्थितीची तयारी सुरू केली असून आपत्कालीन मदतकार्यासाठी मदत पुरवली जाईल, असे म्हटले आहे.

दरम्यान, नेपाळमधील अधिकाऱ्यांनी भोटे कोशी नदी परिसरात दुसऱ्या पुराचा धोका असल्याचा इशारा दिला आहे.

नेपाळच्या नॅशनल डिजास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट ऑथॉरिटीनं सांगितलं, चीनकडून मिळालेल्या उपग्रह माहितीवरून नदी अडवली गेली असून कालच्या अचानक आलेल्या पुराच्या ठिकाणाजवळ एक तलाव तयार झाला आहे.

सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये प्राधिकरणानं म्हटलंय, "तलावातील पाण्याची पातळी वाढत आहे आणि तो फुटण्याचा धोका आहे."

त्यांनी नदीच्या खालच्या प्रवाहाजवळ राहणाऱ्या नागरिकांना आणि मदतकार्य पथकांना "विशेष सावधगिरी बाळगा" असं आवाहन केलं असून नदीकाठापासून दूर सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला आहे.

नेपाळमधील त्रिभुवन विद्यापीठाच्या सेंटर फॉर डिसास्टर स्टडीजचे संचालक बसंत राज अधिकारी यांनी बीबीसी न्यूजडेशी बोलताना आज किंवा उद्या "दुसरी आणि तिसरी लाट येण्याचा धोका" असल्याचे सांगितले.

याबद्दल "आम्हाला अद्याप माहिती नाही," असंही ते म्हणाले. या परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या चीनमधील सहकाऱ्यांशी सतत चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. "सध्या मोठा पाऊस पडत नाहीये, पण भूस्खलन होऊ शकतं."

ते म्हणाले, "हवामान बदलाचा परिणाम येथे खरोखरच दिसत आहे."

"आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवत होतो, पण हे एखाद्या विशिष्ट दिवशी घडेल हे आम्हाला माहित नव्हतं," असेही त्यांनी सांगितले.

'कैलास मानसरोवर'साठी गेलेले भारतीय भाविक बेपत्ता

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे 130 हून अधिक भारतीय बेपत्ता आहेत. यात कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या भाविकांची संख्या जास्त आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, काठमांडूमधील भारतीय दूतावासासह तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्याच्या सरकारांनी हेल्पलाइन सुरू केल्या आहेत.

सम्राट टूर्स अँड ट्रॅव्हल या एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता भारतीयांमध्ये किमान 59 जण कैलास मानसरोवरचे यात्रेकरू आहेत. परंतु, नेपाळमधील संपर्क व्यवस्था मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याने बेपत्ता भारतीयांबाबत अद्याप सविस्तर माहिती समजू शकलेली नाही.

तामिळनाडूचे 37 पर्यटक अजूनही बेपत्ता

तामिळनाडू सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातून नेपाळला गेलेल्या 57 पर्यटकांपैकी 37 जणांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. तर 20 पर्यटकांचा शोध लागला आहे. हे पर्यटक हिमालयातील एका मंदिराकडे जात होते, असं सांगण्यात येत आहे.

कोइम्बतूर येथील ईशा फाउंडेशननेही त्यांचे 80 सदस्य नेपाळमधील एका इमिग्रेशन सेंटरमध्ये होते, असा दावा केला आहे. परंतु, पुरानंतर त्यांच्याशी संपर्क झालेला नाही.

ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी सांगितलं की, इमिग्रेशन कार्यालयात असलेल्या लोकांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. फाउंडेशनचे 495 जण मात्र सुरक्षितपणे परतले आहेत.

पुरामध्ये आपल्या समुहातील 80 जण बेपत्ता झाल्यानंतर सद्गुरूंनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाकडे घटनास्थळी जाण्याची परवानगी मागितली आहे.

पश्चिम बंगालच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोलकात्याहून कैलास मानसरोवर यात्रेला गेलेला 32 जणांचा गटही पुरानंतर बेपत्ता आहे. या गटात 30 भाविक आणि 2 टूर मॅनेजर आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पूर आल्यानंतर या 32 जणांपैकी कोणाशीही संपर्क होऊ शकलेला नाही. बचाव पथकं बाधित भागात त्यांचा शोध घेत आहेत.

पुराच्या आधीची आणि नंतरची सॅटेलाईट छायाचित्रं

नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं होतं पुराचं कारण

नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांनी या आपत्तीनंतर देशाच्या प्रतिनिधी सभेला संबोधित केलं होतं.

रसुवामधील आपत्तीची परिस्थिती भूकंपासोबत झालेल्या हिमस्खलनामुळे निर्माण झाली असून, याबाबत अधिक माहिती घेतली जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

सकाळी सुमारे 8:40 वाजता रसुवामधील भोटेकोशी नदीला आलेल्या पुरामुळे रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांतील अनेक भाग प्रभावित झाले. तिमुरे, स्याफ्रुबेसी, बेत्रावती, त्रिशूली, बत्तर आणि देवीघाटसह अनेक भागांमध्ये मोठं नुकसान झालं आहे.

26 ऑगस्टला सकाळी 8:37 वाजता झालेल्या भूकंपामुळे हा पूर आला असून, भोटेकोशी आणि त्रिशूली नद्यांच्या किनारी भागांमध्ये अजूनही धोका कायम असल्याचं त्यांनी सांगितलं.

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी चर्चा केली होती.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती देताना म्हटलं होतं, "पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी चर्चा केली. नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल संवेदना व्यक्त केल्या. या कठीण काळात भारतातील लोक नेपाळमधील आपल्या बंधू-भगिनींसोबत ठामपणे उभे आहेत."

ते पुढे म्हणाले, "भारत नेपाळला शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. मदत आणि बचावकार्यांसाठी आमची पथकं नेपाळच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करत आहेत."

नदी किनाऱ्याच्या भागांपासून दूर राहण्याचं आवाहन

नेपाळच्या गृह मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध करून सांगितलं की, सेना आणि खासगी हेलिकॉप्टरांच्या मदतीने रसुवागढी, तिमुरे, स्याफ्रुबेसी आणि मैलुंग या प्रभावित भागांमध्ये बचाव मोहीम सुरू आहेत.

सरकारने पुराचा फटका बसलेल्या जिल्ह्यांना तीन महिन्यांसाठी 'आपत्तीग्रस्त क्षेत्र' घोषित करण्याचाही निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

परराष्ट्रमंत्री खनाल यांनी म्हटलं होतं की, रसुवामध्ये आलेल्या पुरामुळे 'राष्ट्रीय आपत्तीची परिस्थिती' निर्माण झाली आहे.

भोटेकोशी आणि त्रिशूली नद्यांच्या किनारी भागांमध्ये अजूनही धोका कायम असून, नुवाकोट, धाडिंग, गोरखा आणि चितवन जिल्ह्यांतील नदीकाठच्या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांनी अत्यंत सतर्क राहावं, असं आवाहन त्यांनी केलं.

खनाल यांनी सांगितलं की, सर्व यंत्रणांना नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्यात तातडीने सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकार विविध मंत्रालयं आणि सैन्याच्या मदतीने जखमींना मोफत उपचार देत असून, संकटात अडकलेल्या लोकांना वाचवून सुरक्षित ठिकाणी पोहोचवत आहे.

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपत्कालीन बैठक घेतल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं, "वैद्यकीय पथकं, स्काउट्स आणि रेड क्रॉस यांच्या समन्वयाने आवश्यक पावलं उचलण्याचं काम सुरू झालं आहे."

राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी म्हटलं आहे की, रसुवा आणि नुवाकोटमधून वाहणाऱ्या भोटेकोशी आणि त्रिशूली नद्यांना आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची बातमी ऐकून त्यांना तीव्र दुःख झालं आहे.

2015 च्या भूकंपानंतर नेपाळमध्ये आलेली ही सर्वांत भीषण आपत्ती मानली जात आहे. त्या भूकंपात सुमारे 9,000 लोकांचा मृत्यू झाला होता.

नेपाळ-चीन सीमेवरील अनेक सखल जिल्हे या पुरामुळे प्रभावित झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जीवित आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे, मात्र अद्याप नुकसानीचा स्पष्ट अंदाज लावता आलेला नाही.

भोटेकोशी नदीकाठावरील रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांतील अनेक वस्ती सर्वाधिक प्रभावित झाल्या आहेत. या भागात लोकसंख्या कमी असली तरी येथील रस्ते नेपाळ-चीन व्यापारासाठी महत्त्वाची जीवनवाहिनी आहेत. या परिसरातील जलविद्युत प्रकल्प, महामार्ग आणि पूल यांसह महत्त्वाची पायाभूत सुविधा नष्ट झाली आहे.

गेल्या वर्षी याच भागात अचानक आलेल्या पुरात 18 जणांचा मृत्यू झाला होता आणि 6 अब्ज नेपाळी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं होतं.

नेपाळमधील भारतीय दूतावासाकडून मदतीसाठी आपत्कालीन क्रमांक जारी

नेपाळमधील भारतीय दूतावासानं पूरपरिस्थितीत अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी आणि संबंधित माहिती देण्यासाठी आपत्कालीन क्रमांक जारी केलेले आहेत.

कोणत्याही माहितीसाठी या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येईल, असं दूतावासानं कळवलं आहे.

संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहेत:

  • +977 985 131 6807
  • +977 970 910 7500

अनेक जणांची सुटका

26 ऑगस्टला मदत आणि बचाव कार्यात 12 जणांची सुटका करण्यात आली होती.

सशस्त्र पोलीस दलाच्या 13 जवानांचा संपर्क तुटून ते बेपत्ता झाल्यानंतर शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आल्याचं सशस्त्र पोलीस दलानं सांगितलं आहे.

सशस्त्र पोलीस दलाचे उप-प्रवक्ते शैलेंद्र थापा यांनी सांगितलं की, रसुवामधील मैलुंग येथून चार आणि तिमुरे इथून नऊ जण बेपत्ता आहेत.

त्यांनी सांगितलंय की, "आम्ही बालंबूमधील 100 खाटांचं रुग्णालय सज्ज ठेवलं आहे."

रसुवा आणि नुवाकोटमधून वाहणाऱ्या भोटे कोशी आणि त्रिशूल नद्यांमधील पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या वृत्तावर राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

काठमांडूमध्ये वास्तव्यास असलेल्या यी लियांग या चिनी व्यावसायिकाने बीबीसीला सांगितलं की, "आमच्या लॉजिस्टिक्स कंपनीचे सात कंटेनर ट्रक तिथे आहेत आणि त्यावर पूर्णपणे नेपाळी कर्मचारी कार्यरत आहेत. आमचा त्या सर्वांशी संपर्क तुटला आहे. तिथं नेटवर्क सिग्नल नसल्यामुळे आम्ही कोणाशीही बोलू शकत नाही."

"जितकं मला माहितीय, त्यानुसार कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. दरडी कोसळणं किंवा भूस्खलन होणं, विशेषतः पावसाळ्यात, या घटना अधूनमधून घडत असतात. परंतु, ही घटना मात्र अत्यंत गंभीर असल्याचं दिसून येत आहे."

नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं धोकादायक क्षेत्रांमधील नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचं आणि खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)