3 हजार वर्षांनी उघडली सोन्याने मढवलेली कबर, समोर आली 'राजाच्या शापा'ची कहाणी

    • Author, ग्रेग हॉकिट
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

बीबीसीच्या 1936 सालच्या एका माहितीपटात (डॉक्युमेंट्री) पुरातत्त्वशास्त्रज्ञ हॉवर्ड कार्टर यांनी 12 फेब्रुवारी 1924 चा तो क्षण सांगितला आहे. तब्बल 3300 वर्षांनंतर त्यांनी आणि त्यांच्या टीमने पहिल्यांदाच इजिप्तच्या या तरुण राजाला पाहिलं होतं.

"ज्या ठिकाणी आम्ही उभे होतो, तिथे शेवटचा माणूस येऊन तब्बल 33 शतकं उलटून गेली होती. पण, आजूबाजूला नुकतंच कोणी तरी इथे येऊन गेल्याच्या खुणा दिसत होत्या."

साधारण 90 वर्षांनंतर आजही हॉवर्ड कार्टर यांचा स्पष्ट इंग्रजी आवाज ऐकला की, जणू आपण दुसऱ्याच काळात गेल्यासारखं वाटतं. 1936 मध्ये बीबीसी रेडिओवर त्यांनी ही मुलाखत दिली होती. त्यावेळी इजिप्तचा राजा तुतानखामेन याची खजिन्याने भरलेली कबर त्यांनी शोधून 14 वर्षे उलटून गेली होती.

कार्टर आणि त्यांच्या टीमने ही जवळपास चमत्कार वाटावी अशी शोधमोहीम यशस्वी केली होती. या तरुण राजाची कबर अजूनही सुरक्षित होती. तिचे कोणतेही नुकसान झाले नव्हते. या शोधामुळे कार्टर हे जगभर प्रसिद्ध झाले.

या शोधामुळे प्राचीन इजिप्तबद्दल लोकांमध्ये आणखी उत्सुकता निर्माण झाली. 1924 मधील त्या घटनेबद्दल बोलताना कार्टर यांनी त्यावेळी त्यांना आलेली एक वेगळीच भावना सांगितली होती.

12 फेब्रुवारी रोजी ते अखेर तुतानखामेनच्या दगडी शवपेटीपर्यंत पोहोचले. या शवपेटीला 'सारकोफॅगस' असं म्हटलं जातं. हजारो वर्षांपासून राजाचे शरीर या दगडी शवपेटीत अगदी सुरक्षितपणे जतन करून ठेवलं होतं.

"अर्धी भरलेली चुन्याची बादली, काळा पडलेला दिवा आणि सुताराने निष्काळजीपणे जमिनीवर टाकलेले लाकडाचे तुकडे," अशा छोट्या-छोट्या गोष्टींची आठवण कार्टर सांगतात. या गोष्टी सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव आजही तितकेच जिवंत वाटतात.

"आम्ही दोन खोल्यांमध्ये प्रवेश केला होता. परंतु, सोन्याच्या मंदिरासारख्या दिसणाऱ्या पेटीजवळ पोहोचलो, तेव्हा तिचे दरवाजे बंद आणि ते सीलबंद केलेले होते. ते पाहून आम्हाला जाणवलं की, आता आम्ही असं काही पाहणार आहोत, जे आमच्या काळात याआधी कुणीही पाहिलेलं नव्हतं," असं कार्टर यांनी म्हटलं.

मौल्यवान मोहोर काढून दरवाजा उघडला, तेव्हा आत आणखी एक पेटी दिसली. त्यावर केलेलं नक्षीकाम तर आधीच्या पेटीपेक्षाही अधिक सुंदर, भव्य आणि अद्भुत असं होतं.

त्यांनी दरवाजा हळूहळू उघडताच त्यांच्या डोळ्यांसमोर पिवळ्या क्वार्टझाइट दगडाची एक मोठी सारकोफॅगस (दगडी शवपेटी) दिसली.

त्यातून पुढे जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नव्हता. पुढे जाण्यासाठी तब्बल 2500 पौंड म्हणजेच सुमारे 1130 किलो वजनाचं दगडी झाकण उचलणं गरेजंच होतं.

काही मान्यवर आणि निमंत्रित व्यक्तींच्या उपस्थितीत एका खास यंत्राच्या मदतीने दगडी झाकण उचलण्यात आलं. जेव्हा कार्टर यांनी झाकण बाजूला केलं तेव्हा प्रकाश थेट शवपेटीच्या आत पोहोचला.

"आमच्या डोळ्यांसमोर जे दृश्य दिसलं ते इतकं अद्भुत आणि भव्य होतं की आम्ही आश्चर्याने थक्क झालो. तरुण राजा तुतानखामेनचा सोन्याचा पुतळा आणि त्यावरील सुंदर नक्षीकाम संपूर्ण शवपेटीच्या आत पसरलेलं होतं. ही तीन शवपेट्यांपैकी सर्वात बाहेरची शवपेटी होती. या तिन्ही शवपेट्या एकाच्या आत एक अशा पद्धतीने ठेवलेल्या होत्या."

"तरुण राजा तुतानखामेनचं शरीर त्या तीन शवपेट्यांमध्ये ठेवण्यात आलं होतं," असं त्यांनी सांगितलं.

जगातील सर्वात मोठ्या पुरातत्त्वीय शोधांपैकी एक शोध लावणाऱ्या कार्टर यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी शाळा सोडली होती. विशेष म्हणजे त्यांनी पुरातत्त्वशास्त्राचं कोणतंही औपचारिक असं शिक्षण घेतलेलं नव्हतं.

चित्रकलेच्या कौशल्यामुळे एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबाचं लक्ष कार्टर यांच्याकडे गेलं. हे कुटुंब नॉरफोकमधील त्यांच्या घराजवळ राहत होतं. या कुटुंबाने एकट्या पडलेल्या तरुण कार्टरला मदत केली.

अम्हर्स्ट कुटुंबाचं निवासस्थान असलेलं टिडलिंग्टन हॉल हे ब्रिटनमधील प्राचीन इजिप्तशी संबंधित वस्तूंच्या सर्वात मोठ्या खासगी संग्रहांपैकी एक होतं. या वस्तू आणि त्यांच्याशी जोडलेल्या कथांचा कार्टरवर खूप प्रभाव पडला होता.

चित्रकलेच्या त्यांच्या कौशल्यामुळे वयाच्या 17व्या वर्षी त्यांना इजिप्तमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिथे ते नकाशे तयार करणे आणि प्राचीन चित्रं व शिलालेखांच्या हुबेहूब प्रती काढण्याचं काम करत होते.

ते अशा काळात इजिप्तला गेले, जेव्हा पुरातत्त्व क्षेत्रात झपाट्याने नवनवीन शोध लागत होते. या संशोधनासाठी लागणारा बहुतांश खर्च श्रीमंत लोक आणि ब्रिटिश उमराव म्हणजेच प्रतिष्ठित घराणे करत असत.

काम करत असतानाच त्यांनी 20 वर्षांहून अधिक काळ प्रशिक्षण घेतलं.

तुतानखामेनची कबर शोधण्यात त्यांच्या नशिबाचीही मोठी भूमिका होती.

कार्टर अनेक वर्षांपासून 'व्हॅली ऑफ द किंग्स'मध्ये शोधकार्य करत होते. परंतु, त्यांना मोठं यश काही मिळालं नव्हतं. नाईल नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेलं हे ठिकाण प्राचीन इजिप्तमधील फॅरो राजांच्या कबरींसाठी प्रसिद्ध होतं.

कबरीचं प्रवेशद्वार अनेक वर्षं जुन्या माती आणि ढिगाऱ्याखाली दबून गेलं होतं. त्यामुळे चोरांनाही आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञांनाही या कबरीपर्यंत पोहोचणं कठीण झालं होतं.

राजा तुतानखामेनच्या पूजेची रंजक कहाणी

या शोधाला मोठं वळण नोव्हेंबर 1922 मध्ये मिळालं. कार्टर यांनी हातात मेणबत्ती घेऊन एका छोट्या दरवाजातून आत डोकावून पाहिलं.

त्यांचे श्रीमंत आश्रयदाते लॉर्ड कार्नार्व्हन जवळच उत्सुकतेने वाट पाहत होते. त्यांनी कार्टर यांना आत काही दिसतंय का, असं प्रश्न विचारला. त्यावर कार्टर यांनी उत्तर दिलं, "हो, आश्चर्यकारक, अद्भुत अशा गोष्टी दिसत आहेत."

त्यांनी आपल्या उत्खननाच्या नोंदवहीत लिहिलं, "डोळ्यांना प्रकाशाची सवय होत गेली, तसतशा खोलीतील वस्तू धुक्यातून हळूहळू दिसू लागल्या. विचित्र प्राणी, पुतळे- मूर्ती आणि सोनं... नजर जाईल तिथे सोन्याचीच चमक दिसत होती."

या सर्व मौल्यवान वस्तू तुतानखामेनच्या मृत्यूनंतरच्या जीवनात (परलोक) त्याच्यासोबत नेण्यासाठी कबरीत ठेवण्यात आल्या होत्या.

इजिप्तच्या 18व्या राजघराण्यातील 11वा फॅरो तुतानखामेन याचा मृत्यू झाला, तेव्हा त्याचं वय अवघं 17 वर्षेचा होतं. त्याने वयाच्या 8 किंवा 9व्या वर्षी इजिप्तची राजगादी सांभाळली होती, असं मानलं जातं.

त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण आजही समोर आलेलं नाही. त्याची हत्या झाली असावी किंवा शिकारीदरम्यान अपघातात त्याचा मृत्यू झाला असावा, असे अनेक तर्कवितर्क लावले जातात.

12 फेब्रुवारी 1924 रोजी हॉवर्ड कार्टर त्या ठिकाणी पोहोचले, जिथे तुतानखामेनची दगडी शवपेटी हजारो वर्षांपासून ठेवलेली होती.

नोव्हेंबर 1922 मध्ये लागलेला शोध ही एक केवळ सुरुवात होती. त्यावेळी एक छोटा बाहेरचा कक्ष सापडला होता, ज्याला कार्टर यांनी 'अँटेरिअर चेंबर' म्हणजेच 'पुढची खोली' असं नाव दिलं. तिथून तुतानखामेनच्या दगडी शवपेटीपर्यंत पोहोचण्यासाठी टीमला आणखी जवळपास 15 महिने लागले.

'द टाइम्स' या वृत्तपत्राने या शोधावर जगभरात एक विशेष बातमी प्रसिद्ध केली. या शोधाला 'या शतकातील सर्वात रोमांचक इजिप्शियन पुरातत्त्वीय शोध' असं म्हटलं गेलं. त्यानंतर राजा तुतानखामेनबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.

1920च्या दशकात इजिप्तबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. त्याचा प्रभाव कपड्यांच्या डिझाइनपासून ते पिरॅमिड्स आणि कमळाच्या फुलांच्या आकाराच्या आर्ट डेको डिझाइनपर्यंत दिसून आला. त्याचबरोबर मूक चित्रपट आणि जॅझ गाण्यांमध्येही इजिप्तचा प्रभाव दिसून येत होता.

कार्टर आणि कार्नार्व्हन दोघेही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले. परंतु, हा शोध लागल्यानंतर काही महिन्यांतच कार्नार्व्हन यांचं निधन झालं. एका कीटकाच्या चाव्यामुळे शरीरात विष पसरल्याने त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यूनंतर तुतानखामेनच्या कथेबद्दल लोकांमध्ये आणखी उत्सुकता वाढली. 'ममीचा शाप' आणि 'तुतानखामेनचा बदला' अशा गोष्टींमुळे या शोधाभोवतीच्या रहस्याला आणखी बळ मिळालं.

हे सर्व इजिप्तमध्ये राजकीय अस्थिरता असताना घडलं. 1882 पासून इजिप्तवर ब्रिटनचं नियंत्रण होतं. परंतु, 1922च्या सुरुवातीला इजिप्तला काही प्रमाणात स्वातंत्र्य मिळालं होतं.

कार्टर यांचा स्वभाव तापट होता. त्यांच्या उत्खननाच्या कामावर लक्ष ठेवणाऱ्या इजिप्तच्या पुरातत्त्व विभागाशी त्यांचे संबंध अनेकदा तणावपूर्ण असत.

तुतानखामेन इजिप्तला वसाहतवादी राजवटीपासून मुक्त करण्याच्या लढ्याचं प्रतीक बनला. पण, हा शोध लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अनेक इजिप्शियन लोकांचं ज्ञान आणि स्थानिक अनुभव या कथानकात फारसं सांगितलं गेलेलं नाही.

कबरीचं ठिकाण साफ करणाऱ्या कामगारांसोबतच कार्टर यांनी अहमद केरीगर, खत हसन, हुसेन अबू अवाद आणि हुसेन अहमद सईद यांच्यासारख्या कुशल देखरेख करणाऱ्या लोकांसोबतही काम केलं होतं.

तुतानखामेनचं ममी केलेलं शरीर 'व्हॅली ऑफ द किंग्स'मध्येच ठेवण्यात आलं.

परंतु, त्याच्या इतर अनेक मौल्यवान वस्तू सुरुवातीला कैरो येथील संग्रहालयात नेण्यात आल्या होत्या.

त्यात तुतारी किंवा रणशिंगासारखी दिसणारी दोन वाद्यंही होती. त्यापैकी एक चांदीचं, तर दुसरं कांस्याचं होतं. 1939 मध्ये बीबीसीच्या एका विशेष रेडिओ कार्यक्रमात ही दोन्ही वाद्यं वाजवण्यात आली होती.

रेडिओचे प्रसिद्ध निर्माते रेक्स कीटिंग यांनी इजिप्तच्या पुरातत्त्व विभागाकडून यासाठी परवानगी घेतली होती. या परवानगीनंतर बीबीसीवर तब्बल 3 हजार वर्षांनंतर पहिल्यांदाच या प्राचीन वाद्यांचा आवाज प्रसारित केला जाणार होता.

या कार्यक्रमावर 2011 मध्ये बनवलेल्या बीबीसीच्या माहितीपटात पुरातत्त्वशास्त्रज्ञ क्रिस्टिना फिन यांनी सांगितलं, "3 हजार वर्ष जुनं वाद्य प्रत्यक्ष वाजवण्याची कल्पना आज अशक्य वाटते. पण 20व्या शतकाच्या सुरुवातीला पुरातत्त्वीय संशोधन वेगाने प्रगती करत होतं. त्या काळात अशा गोष्टींना फारसं महत्त्व दिलं जात नसत."

या कार्यक्रमासाठी बँडमधील सदस्य जेम्स टॅपर्न यांची हे प्राचीन वाद्य वाजवण्यासाठी निवड करण्यात आली होती. हा कार्यक्रम जगभरात सुमारे 15 कोटी लोक ऐकतील, अशी अपेक्षा होती.

वाद्य वाजवण्यास सुरुवात करण्यापूर्वी कीटिंग यांनी श्रोत्यांना सांगितलं की, या दोन्ही वाद्यांमधून आवाज काढणं सोपं असणार नाही.

परंतु, त्याची चिंता करण्याची गरजच पडली नाही. दोन्ही प्राचीन वाद्यांमधून निघालेला रहस्यमय आवाज अगदी सुस्पष्ट आणि मोठ्याने ऐकू आला.

त्यानंतर कीटिंग यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि नाट्यमय पद्धतीने कार्यक्रमाचा शेवट केला.

"3 हजार वर्षांहून अधिक काळ शांत असलेले इजिप्तच्या गौरवशाली इतिहासाचे हे दोन आवाज आता पुन्हा संपूर्ण जगभर घुमले आहेत," असं त्यांनी म्हटलं.

परंतु, कार्टर हा कार्यक्रम ऐकू शकले नाहीत.

काही आठवड्यांपूर्वीच, वयाच्या 64व्या वर्षी कॅन्सरमुळे कार्टर यांचं निधन झालं होतं. 1970च्या दशकात 'ट्रेझर्स ऑफ तुतानखामेन' या प्रदर्शनाला जगभरात मिळालेल्या यशामुळे तुतानखामेनबद्दलची उत्सुकता पुन्हा वाढली.

या प्रदर्शनातील सर्वात मोठं आकर्षण होतं ते म्हणजे तुतानखामेनचा सोन्याचा मुखवटा. 1972 मध्ये हा मुखवटा पाहण्यासाठी 16 लाखांहून अधिक लोक ब्रिटिश संग्रहालयामध्ये आले होते.

आजपर्यंत या संग्रहालयात सर्वाधिक लोकांनी याच प्रदर्शनाला भेट दिली आहे. त्यानंतर हे प्रदर्शन 2 वर्षांसाठी सोव्हिएत युनियनमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर 1976 ते 1979 या काळात अमेरिकेतील 6 शहरांमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलं.

अमेरिकेतही या प्रदर्शनाला खूप मोठं यश मिळालं. या प्रदर्शनापासून प्रेरणा घेऊन कॉमेडियन स्टीव्ह मार्टिन यांनी 'किंग तुत' हे मजेदार असं विनोदी गाणं तयार केलं.

'सॅटरडे नाईट लाइव्ह' या कार्यक्रमामध्ये त्यांनी गंभीर चेहऱ्याने प्रेक्षकांना सांगितलं, "तुतानखामेनला छोट्या वस्तू, खेळणी, टी-शर्ट आणि पोस्टर अशा व्यापारी वस्तूंमध्ये बदलणं आपल्या देशासाठी लाजिरवाणं आहे." त्यानंतर त्यांनी एक मजेदार नृत्य सादर केलं.

लोकप्रिय संस्कृतीपासून ते गंभीर शैक्षणिक अभ्यासापर्यंत, तुतानखामेनची कहाणी आजही लोकांमध्ये उत्सुकता कायम ठेवते.

तुतानखामेनची कबर सापडून 100 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही त्या ठिकाणी सापडलेल्या अनेक मौल्यवान वस्तूंची रहस्यं अद्यापही उलगडलेली नाहीत.

2019 मध्ये बीबीसीच्या 'इन अवर टाइम' कार्यक्रमात ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एलिझाबेथ फ्रूट यांनी सांगितलं होतं की, कबरीत सापडलेल्या एकूण वस्तूंपैकी एक-तृतीयांशपेक्षाही कमी वस्तूंचा पूर्ण अभ्यास झाला आहे.

"तिथे 5 हजार हून अधिक विविध वस्तू आहेत. इतक्या मोठ्या संख्येने वस्तू सांभाळणं खूप कठीण आहे. या संग्रहातील वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची देखभाल आणि व्यवस्था करणं सोपं नाही. यासारखा दुसरा संग्रहच नाही," असं त्यांनी सांगितलं.

कबरीमध्ये सापडलेल्या सर्व वस्तू अखेर 2025 मध्ये गिझा येथील एका नवीन संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या. हे संग्रहालय प्राचीन जगातील 7 आश्चर्यांपैकी एक असलेल्या खुफूच्या ग्रेट पिरॅमिडजवळ उभारण्यात आलं आहे.

ग्रँड इजिप्शियन म्युझियमचे माजी प्रमुख डॉ. तारिक तौफिक यांनी बीबीसीला सांगितलं, "तुतानखामेनला नवीन पद्धतीने लोकांसमोर कसं मांडता येईल, याचा मला विचार करावा लागला. 1922 मध्ये कबर सापडल्यापासून त्यातील 5500 हून अधिक वस्तूंपैकी केवळ साधारण 1800 वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे कबरीतील सर्व वस्तू एकाच ठिकाणी प्रदर्शित करण्याची कल्पना माझ्या मनात आली. यामधील एकही वस्तू संग्रहात ठेवली जाणार नाही किंवा दुसऱ्या संग्रहालयात पाठवली जाणार नाही. त्यामुळे लोकांना संपूर्ण कबर पाहण्याचा आणि अनुभवण्याचा अनुभव मिळेल, अगदी 100 वर्षांपूर्वी हॉवर्ड कार्टर यांना आला होता तसा."

तुतानखामेनचा सोन्याचा मुखवटा संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. पण, त्याची ममी अजूनही 'व्हॅली ऑफ द किंग्स'मध्ये आहे. कार्टर आणि त्यांच्या टीमने तिथे पोहोचल्यावर आजूबाजूला नुकतंच कोणी तरी येऊन गेल्याच्या अनेक खुणा पाहिल्या होत्या.

बीबीसी रेडिओवरील कार्यक्रमात कार्टर यांनी सारकोफॅगसच्या सोन्याच्या बाहेरील झाकणावर ठेवलेल्या फुलांच्या छोट्या हाराचा उल्लेख केला होता. त्यांच्या मते, कदाचित "तरुण राणीने आपल्या पतीला अखेरचा निरोप देताना दिलेली ही भेट असू शकते."

"इतक्या राजेशाही वैभवातही ती कोमेजलेली फुलं सर्वात सुंदर वाटत होती. त्या फुलांनी आम्हाला जाणवून दिलं की, 3300 वर्षांचा काळही खरंतर तसा फार मोठा नसतो," असं त्यांनी म्हटलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)